पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईमधील व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे 35 लाखांसाठी अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून त्यांची निगडी पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून इतर तीन आरोपी फरार आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी माहिती दिली आहे. त्याचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस घेत आहेत. या घटने प्रकरणी निगडी पोलिसात ४३ वर्षीय व्यापाऱ्याने (शेअर मार्केट ब्रोकर) फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी शशांक कदम आणि हरीश राजवाडेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुख्य आरोपी अमर कदम यांच्यासह तीन जण फरार आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय फिर्यादी हे शेअर मार्केट चे ब्रोकर असून २७ वर्षीय मॅनेजर हे दोघे ही आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये कामानिमित्त थांबले होते. दरम्यान, फिर्यादी यांचे मॅनेजर हे एका व्यक्तीकडून हॉटेल च्या जवळ च गुंतवणूक करण्यासाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी गेले होते.

तेव्हा, मॅनेजर चे अज्ञात आठ जणांनी अपहरण केले. मॅनेजरने फिर्यादी व्यापारी यांना फोन लावून पाच लाख रक्कम समोरच्या व्यक्तीकडून घेतले अस सांगत मला वाचवा, अस म्हणून फोन कट झाला..काही वेळानंतर फिर्यादी यांनी मॅनेजर च्या नंबरवर फोन केला असता ओळखीचा व्यक्ती आरोपी अमर कदम याने फोन उचलून तुझा मॅनेजर आमच्या ताब्यात आहे. त्याला सोडवण्यासाठी ३५ लाख रुपये दे असे सांगितले. फिर्यादी यांनी होकार दिला..त्यानंतर पुन्हा फिर्यादी यांच्या नंबर फोन आला आणि आत्ताच पैसे हवे आहेत अन्यथा मॅनेजर ला जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. वारंवार फोन येत असल्याने अखेर फिर्यादी व्यापारी यांनी थेट निगडी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत, तपास पथक तयार केली. आरोपी यांना पैसे घेण्यास बोलावले.

तेव्हा आरोपी यांनी इतर व्यक्तीला पाठवले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरांना पोलीस आपल्या मागावर आहेत अशी माहिती मिळताच अपहरण केलेल्या मॅनेजर ला शहरातील डांगे चौकात सोडून देऊन पोबारा केला आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

…अन आरोपींची पैसे न मिळाल्याने अपहरण?

संबंधित अपहरणाचा गुन्ह्यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते. त्याचा परतावा न मिळाल्याने शेअर मार्केट ब्रोकर असलेल्या व्यापाऱ्याच्या मॅनेजर चे अपहरण करत ३५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती अस पोलीस तपासात समोर आले आहे.