18 November 2017

News Flash

सोवळं प्रकरणी मेधा खोले यांच्या अटकेची मागणी

विविध सामाजिक संघटना २५ सप्टेबरला रस्त्यावर उतरणार

पुणे | Updated: September 13, 2017 3:57 PM

सोवळं प्रकरणी डॉ मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पुण्यातील हे प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणी खोले यांच्यावर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेतली. मात्र, आता मेधा खोले यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती समन्वय समितीने केली आहे. यासाठी २५ सप्टेंबरला मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शांताराम कुंजीर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

शांताराम कुंजीर म्हणाले की, पुण्यासारख्या शहरात २१ व्या शतकात एका आधिकारी महिलेकडून एका महिलेचा अशाप्रकारे अपमान होणे योग्य नाही. त्यामुळेच त्यांच्याविरोधात लढा उभारला जाणार आहे. न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी निर्मला यादव देखील उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, मेधा खोले यांच्या आरोपामुळे खूप दुःख झाले असून त्यांना अटक करण्यात यावी. त्यामुळे आपण २५ सप्टेंबरच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी सोवळं प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या सर्व घडामोडीनंतर सोशल मीडिया आणि सामाजिक संघटनांकडून मेधा खोले यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मेधा खोले यांनी तक्रार मागे घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता मेधा खोले यांना अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी लाल महाल ते पुणे पोलिस आयुक्त कार्यालापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात निर्मला यादव यांच्यासह विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

First Published on September 13, 2017 3:57 pm

Web Title: maratha morcha organised on 25th september to demand the arrest of dr medha khole