लढवय्यी बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिच्यावरील चित्रपटाला मणिपूरमधील चित्रपटगृहांमध्ये बंदी असली तरी पुण्यातील मणिपुरी संघटनेचे कार्यकर्ते रविवारी (७ सप्टेंबर) संपूर्ण चित्रपटगृह बुक करून हा चित्रपट पाहणार आहेत.
पुण्यात राहणाऱ्या मणिपुरी बांधवांनी असोसिएशन ऑफ मणिपुरी डायस्फोरा (अमण्ड) ही संघटना स्थापन केली आहे. ती मणिपुरींना वेगवेगळी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत आहे. मणिपूरमधील दहशतवादी संघटनेने सर्वच हिंदी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पुण्यातील अमण्ड संघटनेतर्फे मेरी कोम हिचा सन्मान म्हणून हा चित्रपट पुण्यात एकत्र दाखवला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी विमाननगर येथील इनॉर्बिट मॉलमधील ‘सिनेमॅक्स’ मधील एक स्क्रीन सकाळी १०.४५ च्या खेळासाठी बुक केलेली आहे, अशी माहिती या संघटनेचे सचिव डॉ. एच. नरेंद्र सिंग यांनी दिली.