पर्यावरण विकासाचा चांगला हेतू ठेवून िपपरी पालिकेने सुरू केलेल्या स्वतंत्र पर्यावरण विभागाचा मनमानी व भोंगळ कारभार अनेक प्रकरणांच्या माध्यमातून चव्हाटय़ावर आल्यानंतर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत सत्ताधारी नेत्यांच्या पाठबळावर उडय़ा मारणारे या विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना आयुक्तांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणात कर्तव्यात कसूर व शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून खातेनिहाय चौकशी का करू नये, अशी विचारणा केली आहे.
मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचना पाळल्या नाहीत. कचऱ्यापासून निर्मिती होणाऱ्या खताची पुरेशी माहिती दिली नाही. प्रकल्पातील त्रुटी लक्षात आणून दिल्या नाहीत. करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग केला. २० लाख खर्च करून संत तुकारामनगर व शाहूनगर येथे बसवण्यात आलेल्या ‘इकोमॅन’ मशिनची देखरेख करण्यात कुचराई केली. याशिवाय, २५ लाख रुपयांचे ‘ओडो फ्रेश’ खरेदी प्रकरणातही कुलकर्णी यांना दोषी धरण्यात आले. या तीनही प्रकरणांमध्ये कुलकर्णींना दोषी धरून नोटीस बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  
पर्यावरण विभागाची स्थापना झाल्यानंतर कुलकर्णी यांना त्याची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून ते वादात आहेत. कार्यकारी अभियंतापदासाठी पात्र आहेत का, याविषयी साशंकता व्यक्त केली जाते. केवळ निविदा काढण्यापुरते मर्यादित काम ते करतात, अन्य कोणत्याही कामाला हात लावत नाहीत, अशी तक्रार त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. कुलकर्णी यांना असलेल्या राजकीय पाठबळामुळे अन्य अधिकाऱ्यांना ते जुमानत नव्हते. सहआयुक्त अमृत सावंत यांच्याकडे या विभागाची जबाबदारी होती. मात्र, कुलकर्णी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात सावंतांना अपयश आल्याने त्यांनी या विभागाची जबाबदारी सोडून दिली. शिवसेनेने विशेषत: नगरसेविका सीमा सावळे यांनी पर्यावरण विभागातील गैरव्यवहारांची एकापाठोपाठ एक प्रकरणे बाहेर काढली. त्यामध्ये संशयाची सुई कुलकर्णी यांच्याकडे जात होती. या तीनही प्रकरणांमध्ये कुलकर्णी यांनी केलेल्या उद्योगांची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली व त्यांना एकाच वेळी तीन नोटिसा बजावल्या आहेत.