ठेकेदार कंपन्यांनी कामगारांचे पगार थकवले

पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे महामेट्रोचे काम वेगाने सुरू असताना त्याअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो स्थानकांचे काम मात्र बंद पडले आहे. मेट्रोने ठेका दिलेल्या दोन कंपन्यांनी सुमारे १०० कामगारांचे पगार पाच महिने थकवल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी महामेट्रोने दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली आहे.

महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते दापोडी दरम्यान पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दापोडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, पिंपरी आणि एम्यायर इस्टेट (मोरवाडी) अशा पाच ठिकाणी मेट्रो स्थानके होणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी स्थानकांचे नियोजन आहे.

पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या कामाचा ठेका दोन कंपन्यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून हे काम संथगतीने होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच होत होत्या. गेल्या काही दिवसांपासून मेट्रो स्थानकाचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. जेमतेम पाया खोदून झाला असल्याचे सांगण्यात आले.

ठेकेदार कंपन्यांनी जवळपास १०० कामगारांचे गेल्या नोव्हेंबरपासूनचे पगार थकवल्याची तक्रार आहे. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मेट्रो प्रशासनापर्यंत हा वाद पोहोचला. तेव्हा त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली. यापूर्वीही अशाप्रकारची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही त्यात सुधारणा होत नसल्याने मेट्रोकडून नव्याने नोटीस बजावली आहे.

कामगारांनी पुणे महामेट्रोकडे तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच महिन्यांचे पगार त्यांना मिळालेले नाहीत. या कामगारांचे पैसे देण्यात यावेत, असे मेट्रोकडून ठेकेदार कंपन्यांना सांगण्यात आले आहे. कामगारांचे थकवलेले पगार आणि संथगतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात मेट्रोने या कंपन्यांना अंतिम नोटीस बजावली आहे.

– डॉ. हेमंत सोनवणे, महाप्रबंधक जनसंपर्क