विदर्भ वगळता सर्वत्र किमान तापमान सरासरीपुढे

पुणे : राज्यात २१ डिसेंबरपासून किमान तापमानात मोठी घट होऊन सर्वत्र कडाक्याची थंडी अवतरली होती. मात्र, सध्या पुन्हा काही प्रमाणात तापमानवाढ सुरू झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तुरळक भाग वगळता मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमानात मोठी वाढ होऊन ते सरासरीपुढे गेल्याने गारवा कमी झाला आहे.

निरभ्र आकाशाची स्थिती आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्याच्या सर्वच भागामध्ये २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कडाक्याची थंडी होती. २२ आणि २३ डिसेंबरला पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यातील बहुतांश भागात यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मात्र, त्यात हळूहळू वाढ होत गेली.

सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह किंचित घटले आहेत. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. परिणामी राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात वाढ दिसून येते.

मध्य महाराष्ट्रात पुणे आणि नाशिकसह सर्वच ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाल्याने गारवा कमी झाला आहे. केवळ सोलापूर भागातच किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे.

कोकण विभागात मुंबई आणि रत्नागिरीतही किमान तापमान सरासरीपुढे गेले आहे. मराठवाडय़ात औरंगाबादचा तापमानाचा पारा वाढला असून, इतरत्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास असल्याने काही प्रमाणात थंडी आहे. विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीखाली आहे. रविवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ९.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.