मीरा बडवे (निवांत अंध मुक्त विकासालयाच्या संचालिका)
समाजामध्ये सामान्य किंबहुना डोळस नागरिकांप्रमाणेच दृष्टिहीन व्यक्तींनाही वाचनाची आवड असते. परंतु त्यांच्याकडे काहीतरी कमी असल्याची भावना आपणच त्यांना करून देतो. शरीरातील एक अवयव दुर्बळ असल्याची जाणीव त्यांना करून देण्यापेक्षा आम्ही निवांतच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन वष्रे सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश आले आणि ब्रेलमध्ये असलेल्या साहित्याचे दुर्भिक्ष्य हे या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनीच दूर करीत पाचशेपेक्षा जास्त पुस्तके ब्रेलमध्ये साकारून साहित्याचा गौरव केला. माझा वाचनप्रवास आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा याच्या जोरावरच ब्रेल ग्रंथालयाचे स्वप्न साकारणे शक्य झाले.
दृष्टिहीन व्यक्तींना समाजामध्ये नकारात्मक दृष्टिकोनाला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना मी पाहिल्या होत्या. परंतु त्यांच्याकरिता काम करण्याची संधी मला कोरेगाव पार्क परिसरातील अंधशाळेत गेल्यानंतर १९९६ च्या सुमारास मिळाली. बंडगार्डन पुलाजवळ एक दृष्टिहीन मुलगा तब्बल तीन आठवडे अन्नाविना पदपथावर जगत होता. त्यावेळी मी अंधशाळेपासून काहीशी बाजूला झाले होते. तो मुलगा आमचे घर शोधत शिक्षणाची भूक भागविण्याकरिता दरवाज्यामध्ये मदतीकरिता आला. त्यावेळी मलाच माझी लाज वाटली आणि निवांत अंध मुक्त विकासालयाचा दरवाजा उघडला गेला. लहानपणापासून आपण जे काही शिकलो, वाचन केले ते या मुलांना शिकवायचे, हा एकच ध्यास उराशी बाळगून मी कामाला सुरुवात केली. यामध्ये मला मोलाची साथ मिळाली, ती पती आनंद बडवे यांची. ते अनेक वर्षांपासून अंधशाळेला आíथक मदत करीत होते. अंधशाळेत जाऊन ते काय करतात, या कुतूहलाने मी एकदा त्यांच्यासोबत गेले आणि या माझ्या आयुष्यातील दृष्टिपर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
आमची मातृभाषा कानडी असली, तरी माझा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याने मराठी व इंग्रजी भाषेशी माझा जवळचा संबंध होता. घरामध्ये वाचनाची आवड असलेली माणसे खूप होती. त्यामुळे लहानपणी किशोर, चंदामामा अशा पुस्तकांसाठी आम्हा पाच भावडांमध्ये अक्षरश: मारामारी होत असे. रामायण, महाभारतातील काही गोष्टी या क्रमश: असत. त्यामुळे पुढील कथेविषयी उत्सुकता कायम टिकून राहात असे. भा. रा. भागवत यांचे फास्टर फेणे तसेच बाबुराव अर्नाळकर यांचे साहित्य वाचले आहे. त्यावेळी आम्ही मुंबईला राहात असू. घरामध्ये रात्री जागरण करणे आवडत नसे. त्यावेळी अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये ना. सी. फडके, पु. ल. देशपांडे यांची पुस्तके ठेवून आम्ही रात्रभर वाचत होतो. मुंबईतील किंग जॉर्ज म्हणजेच आयईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माझे शिक्षण झाले. मुंबईचे पदपथ म्हणजे काही निराळीच मजा. पुस्तक विक्रेत्यांनी सजलेल्या या पदपथांवरून मी एक रुपयाला एक पुस्तक याप्रमाणे २६ पुस्तकांची खरेदी केल्याची आठवण आजही ताजी आहे. वडिलांना पगाराव्यतिरिक्त बोनस किंवा बक्षीस रक्कम मिळाली, तर आमच्या घरामध्ये त्याची केवळ पुस्तके आणि पुस्तकेच आणली जात. किंग जॉर्जपूर्वी मी चेंबूर हायस्कूलमध्ये असताना निबंध स्पध्रेत भाग घेत असे. त्यावेळी कोरी वही हातात घेऊन निबंध चक्क तोंडपाठ म्हणून दाखविणारी मुलगी म्हणून शिक्षकही माझी पाठ थोपटत होते. शिक्षकांनी दिलेले हे प्रोत्साहन आणि घरामध्ये वाचनाचे वातावरण, यामुळेच माझ्या बुकशेल्फमधील पुस्तकांचा संग्रह वाढत गेला.
रुईया महाविद्यालयामध्ये असताना वसंत बापट, सरोजिनी वैद्य यांसारखे दिग्गज आम्हाला मराठी विभागामध्ये शिकवायला होते. त्यांचा सहवास आणि रणजित देसाई, वि. स. खांडेकर यांच्या छावा, स्वामी, अमृतवेल, ययाती या कादंबऱ्या वाचून माझ्या ज्ञानात भर पडत होती. बी. ए. ला इंग्रजी विषय असल्याने शेक्सपियरची नाटके, अॅलन पॅटॉन, किंग लियर यांचे साहित्य मी आवडीने वाचत असे. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये विपुल साहित्याची समृद्धी होती. तेथे मी जात असे, तेथील ग्रंथपालही कोणती पुस्तके वाचावी, याविषयी मला सांगत असत. जे पुस्तक मिळेल, ते वाचायचे हे मनाशी पक्के असल्याने विषयाच्या सीमा कधीही माझ्या वाचनप्रवासात आल्या नाहीत. लग्नानंतर मी पुण्यामध्ये आले आणि आयुष्य जगण्याची दिशा बदलली.
निवांत अंध मुक्त विकासालयाच्या माध्यमातून जगावेगळ्या वाटेवर चालेन, असे कधीच वाटले नव्हते. निवांतचे काम सुरू करण्यापूर्वी मी कर्नाटक हायस्कूलमध्ये इतिहास आणि इंग्रजी शिकविण्याचे काम केले. मात्र, त्यामध्ये मी फारशी रमले नाही. दृष्टिहीन मुलांकरिता काम करायचे आणि त्यांना वाचन समृद्ध करायचे, ही आशा उराशी बाळगून कामाला सुरुवात केली. दृष्टिहीन मुलांचे चेहरे कोरे असतात, त्यामुळे त्यांच्या मनातील अंधाराचे मानसशास्त्र समजून घेत स्वरांच्या जादूने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न मी पुस्तकांच्या माध्यमातून करीत होते. डोळस व्यक्तींकरिता साहित्याचा महासागर उपलब्ध आहे, परंतु दृष्टिहीन व्यक्तींकरिता मात्र ब्रेल साहित्य नाही, ही खंत होती. त्यामुळे सुरुवातीला शैक्षणिक साहित्याचे ब्रेल लिपीमध्ये रुपांतर करण्यास सुरुवात झाली.
ब्रेल लिहून मुलांची बोटे सुजत असत. परंतु तरीही मुलांमध्ये असलेली जिद्द आणि आत्मविश्वास यांमुळे ब्रेल साहित्य साकारण्याची उमेद आणखी वाढली. लीना सोवनी यांच्यामुळे सुधा मूर्ती यांचे साहित्य ब्रेलमध्ये साकारण्यास सुरुवात झाली. हळूहळू िवदा करंदीकर, नारायण सुर्वे, सुधीर मोघे, संदीप खरे यांचे साहित्य ब्रेलमध्ये रुपांतरित करण्याचे काम निवांतला मिळाले. रात्रीचा दिवस करून निवांतमध्ये दृष्टिहिन मुलांनी हे काम सुरू केले. शैक्षणिक साहित्याव्यतिरिक्त अवांतर पुस्तके ब्रेलमध्ये साकारण्याकरिता येत असल्याने माझ्यासह संस्थेतील मुलांचेही वाचन होत असे. तर ब्रेलमध्ये पुस्तक आल्याने आपल्याप्रमाणेच अन्य दृष्टिहीन बांधवांना या पुस्तकाचा आनंद घेता येणार असल्याने काम करण्याकरिता उत्साह निर्माण होत होता.
हळूहळू पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून ब्रेलमध्ये पुस्तके रुपांतरित करण्याची मागणी वाढत आहे. यामुळे माझ्यासह मुलांच्या वाचनामध्ये आणि ज्ञानामध्ये भर पडत आहे. तसेच मुलांना काही प्रमाणात आíथक हातभार लावणे शक्य होत आहे. पूर्वरंग-हिमरंग, तर असं झालं, दुनिया रंगीबेरंगी यांसह अनेक पुस्तके ब्रेलमध्ये साकारण्यात आली. विविध पुस्तकांवर आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. त्यामुळे मुलांना काय समजले आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. मुलांनी ब्रेलमध्ये कोणतेही पुस्तक साकारण्यापूर्वी सर्वप्रथम ते पुस्तक मला वाचावे लागे. त्यामुळे कळत-नकळत बी. ए. इंग्रजी शिक्षणानंतर मराठीपासून दूर गेलेला माझा वाचनप्रवास मुलांमुळे पुन्हा एकदा प्रवाहात आला. निवांतमध्ये असलेल्या ब्रेल ग्रंथालयाकडे पाहिले की साहित्याचे वेगळे भावविश्व उभारल्याचा आनंद मला मिळतो. माझ्या या प्रवासात पाचशेपेक्षा जास्त पुस्तके आणि पाच हजारपेक्षा जास्त क्रमिक पुस्तके वाचायला मिळाली, ती निवांतमधील माझ्या दृष्टिहीन मुलांमुळेच. त्यामुळे त्यांच्या अंधाऱ्या आयुष्यात ब्रेलच्या माध्यमातून वाचनप्रकाश देण्याचे काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे.