फिरोदिया करंडक आंतरमहाविद्याालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत विषय निवडीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. स्पर्धेतील सादरीकरणासाठी काही विद्यार्थ्यांची विषय निवडीवर निर्बंध असू नये अशी भूमिका, तर काहींना हे निर्बंध योग्य वाटतात.

हिंदू-मुसलमान, जम्मू-काश्मीर, कलम ३७०, भारत पाकिस्तान, राम मंदिर-बाबरी मशीद याबाबतचे कुठलेही विषय, तसेच जाती धर्मांबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय घेऊन ‘फिरोदिया करंडक’ आंतरमहाविद्याालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत विद्यााथ्र्यांना सादरीकरण करता येणार नसल्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तसेच या संदर्भातील निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले असून या विषयांशी संबंधित सादरीकरण केल्यास त्याचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गेली काही वर्षे स्पर्धेत याच विषयांशी संबंधित सादरीकरणांची संख्या वाढत असल्याने स्पर्धेत तोचतोचपणा येऊ लागला असून सध्याच्या संवेदनशील काळात सादरीकरणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची आयोजकांची भूमिका आहे.

‘स्पर्धेच्या बैठकीत आयोजकांनी हा नियम सांगितला. त्याचवेळी तो चुकीचा वाटला. सादरीकरणासाठी कोणते विषय घेऊ नयेत हे आयोजकांनी सांगणे पटणारे नाही. पण नीट विचार केल्यावर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. गेली चार-पाच वर्षे याच विषयांवरील सादरीकरणे भरपूर होतात हे खरे आहे. संवेदनशील विषयावर सादरीकरण केले की पारितोषिक मिळते, या समजातून असे विषय निवडले जातात. पण स्पर्धेत वेगळे विषय येण्याच्या दृष्टीने हा नियम चुकीचा वाटत नाही,’ असे एका महाविद्याालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीने सांगितले. तर संयोजकांनी घेतलेली भूमिका रास्त आहे. संवेदनशील विषयावर भाष्य करण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो. मात्र पारितोषिक मिळवण्याच्या उद्देशाने काहीतरी वरवरची आणि अनावश्यक प्रखर मांडणी करणे योग्य नाही. त्यामुळे आयोजकांच्या नियमात आक्षेपार्ह वाटत नाही, असे आणखी एका महाविद्याालयाच्या विद्यार्थ्याने स्पष्टपणे नमूद केले.

मूलभूत हक्काचा विचार करता विषय निवडण्यावर निर्बंध घालणे योग्य नाही. पण स्पर्धेत त्याच त्याच विषयांवर सादरीकरणे होत असतील, तर समाजात काही वेगळे घडत नाही का, समाज म्हणून आपण कमी पडतोय का याचा विचार व्हायला हवा. काही ठरावीक विषयांवरच विद्यार्थ्यांना कलाकृती का कराव्याशा वाटत असतील, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे विषय निवडीवर निर्बंध घालणे हा वरवरचा मुद्दा नाही. आयोजकांनी या सगळ्याचा विचार केला असल्यास त्याचे स्वागत आहे आणि विचार केला नसल्यास त्यांनी निर्बंध घालण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी प्रतिक्रिया लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे.

याचबरोबर लेखक-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी, विद्यार्थ्यांना विषय निवडू नका म्हणण्यापेक्षा संहिता सेन्सॉर करून घेणे बंधनकारक करावे. सादरीकरणांच्या विषयांत तोचतोचपणा असला, तरी प्रत्यक्ष सादरीकरण वेगळेच असते. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेबाबत परीक्षक काय तो निर्णय घेतील. तसेही जगात कथा थोड्याच आहेत आणि त्याच कथा वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात असतात. त्यामुळे आयोजकांनी विषय निवडीवर घातलेले निर्बंध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचाच प्रकार असल्याचे सांगितले आहे.