आमदार लक्ष्मण जगताप यांची टीका

िपपरी-चिंचवड शहराचा विकास केल्याचा दावा सत्तारूढ राष्ट्रवादीकडून करण्यात येत असला, तरी तो वस्तुस्थितीला धरून नाही. केवळ चिंचवड मतदारसंघापुरता विकास मर्यादित असून शहराचा महत्त्वाचा भाग असलेल्या भोसरी, िपपरी भागातील विकास राष्ट्रवादीकडून का झाला नाही, असा प्रश्न भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी थेरगाव येथे बोलताना उपस्थित केला.

थेरगाव येथे भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, सदाशिव खाडे, सरचिटणीस बाबू नायर, वसंत वाणी आदी उपस्थित होते. काळूराम बारणे, अरुण पवार यांनी मेळाव्याचे आयोजन केले. जगताप म्हणाले, आपण अपक्ष आमदार होतो आणि आघाडी सरकारला पािठबा दिला होता. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न सोडवल्यास पािठबा देणार नाही, असे आपण चापेकर चौकात जाहीर सभेत सांगितले होते. अन्यही काही महत्त्वाचे विषय प्रलंबित होते, ते न सोडवल्यास पक्षात राहणार नसल्याचे नेतृत्वाकडे स्पष्ट केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सहा महिने राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी रंग बदलतो ही आपल्यावरील टीका वस्तुस्थितीला धरून नाही. चिंचवडचा विकास कोणी केला हे जनतेला माहिती आहे.

तसा विकास इतर भागात होऊ शकला नाही. आपले समर्थक अधिकाधिक संख्येने निवडून आले, त्यामुळेच पालिकेत राष्ट्रवादीला सत्ता स्थापना करता आली.