मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राज यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीचीदेखील चौकशी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. तर याच दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यात चर्चा देखील झाली. दरम्यान, या भेटीबाबत राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलणे टाळले.

तसेच या भेटीबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ”ठाकरे कुटुंबाशी सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबध आहेत. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती पुण्यात आली की माझी भेट होत असते. तर राज ठाकरे हे पुण्यात आल्यावर आज मला भेटण्यास आले.” त्यांनी माझ्या तब्येती बदल विचारपूस केली असून राज ठाकरे हे नेहमी भेटण्यास येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.