बेसावध व्यक्तींच्या हातून मोबाइल पळवून ते कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीचा चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी लखन अवधूत शर्मा आणि अंकुश भिसे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही भामटे चिंचवडच्या दळवी नगर झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. आणखी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. एका आरोपीच्या आईने पोलिसांना मदत केल्याने या तिघांचा छडा पोलिसांना लावता आला. या टोळीकडून पोलिसांनी १२ लाखापेक्षा जास्त किंमतीचे ११० मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

लखन आणि अंकुश हे एका अल्पवयीन आरोपीसह मिळून आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि निगडी भागांमध्ये मोबाइल चोरी करायचे. बेसावध व्यक्तीचा मोबाइल ते हिसकावून तिथून पळ काढायचे. हे मोबाइल कमी किंमतीत विकायचे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. चिंचवडच्या बिजलीनगर भागात दोन मोबाइल चोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षाक अभिजित जाधव यांच्या टीमने तातडीने सापळा रचला आणि या टोळीवर कारवाई केली. आरोपी लखनची आई मंगल शर्मा या चोरीचे मोबाइल घरात असल्याचे माहित असूनही पोलिसांना त्यांनी सांगितले नाही त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही समजते आहे.