गणेशोत्सवात शहरात दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या संरक्षणासाठी पोलिसांप्रमाणेच पुण्यातील विविध संघटना पुढे येत आहेत. गणेशभक्तांना बॉम्बस्फोट, सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, पाकीट आणि मोबाइल चोरीपासून सावध करीत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या मदतीसाठी व आत्पकालीन परिस्थितीत पोलिसांना सहकार्य करण्यासाठी दहा दिवस मोबाइल व्हॅन कार्यरत राहणार आहे.

पोलीस मित्र संघटना पुणे शहरतर्फे राबविण्यात येणाऱ्या या मोबाइल व्हॅनच्या उपक्रमाचे उद्घाटन परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते झाले. या वेळी शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पी. व्ही. कुलकर्णी, विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शरद उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत मंडलिक, पोलीस मित्र विकास धारणे, शशांक इनामदार, मुश्ताक शेख, विकास शिंदे उपस्थित होते.डॉ. चंद्रकांत मंडलिक म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ एकमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोबाइल व्हॅनमध्ये पोलीस मित्रांचे पथक असणार आहे. बॉम्बशोधक ट्रॉली, वॉकीटॉकी सेट, फायर इिस्टग्विशर, मेटल डिटेक्टर, प्रथमोपचार पेटी यांसह इतर सुरक्षात्मक साधने उपलब्ध असणार आहेत. तसेच समाजप्रबोधन करणारी दहा हजार पत्रके वाटण्यात येणार आहे.