स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हा नारा लोकमान्य टिळकांनी या भूमीत दिला. आता सुराज्य हा तुमचा अधिकार आहे हे सांगायला मी इकडे आलो आहे.. मोदींच्या भाषणाची अशी मराठी सुरुवात होताच सभेतून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. भाषणात पुढेही सातत्याने भाईयों और बहनो.. म्हणत आणि श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे करत मोदींनी गर्दीला भाषणाशी बांधून ठेवले.
मोदी यांनी, ऐतिहासिक पुण्यनगरीत शिवरायांच्या भूमीला माझा त्रिवार नमस्कार, अशी सुरुवात केली. पुणे नगरीचा मोठा प्रभाव आमच्या मनावर आहे. तेजस्वी महापुरुषांची ही भूमी आहे असे ते म्हणाले. पुण्यात काँग्रेसने बाहेरचा उमेदवार का दिला ते समजत नाही. इथला चांगला उमेदवार त्यांना मिळाला नाही का, अशी विचारणा करत पुण्यात काँग्रेसला साथ नाही त्यामुळे देशातही त्यांना लोकांची साथ मिळणार नाही, असे मोदी म्हणाले. सभेत वारंवार मोदी यांनी प्रश्नोत्तरे करत सभेशी संवाद साधला. ‘हाँ कहो’ या ’ना’ असे म्हणत ते श्रोत्यांकडून उत्तरे मिळवत होते. त्यांच्या टीकेला आणि इशाऱ्यांनाही सभेतून मोदी, मोदी.. अशी दाद मिळत होती.
शरद पवार, मनसे..
मनसेवर थेट टीका न करता तुम्हाला महायुतीलाच निवडून द्यायचे आहे, एवढाच सूचक उल्लेख मोदी यांनी सभेत केला. त्याबरोबरच पवार हे सोनियांचेच सरदार आहेत आणि तेही हल्ली रोज माझ्यावर टीका करायला लागले आहेत, एवढीच टीका त्यांनी पवार यांच्यावर केली.

सभेला गर्दी; पण विक्रमी गर्दी मात्र नाही
या सभेसाठी विक्रमी गर्दी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. सभेला चांगली गर्दी झाली; पण विक्रमी गर्दी मात्र नव्हती. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांसाठीची एकत्रित सभा होती. तरीही मुख्य गर्दी पुणेकरांची होणार हेही उघडच होते. त्याप्रमाणे सायंकाळी साडेपाचपासूनच स. प. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी गर्दी सुरू झाली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोदी यांचे आगमन झाले. मात्र त्यानंतरही श्रोत्यांसाठी ठेवलेल्या खुच्र्याच्या काही रांगा रिकाम्या होत्या. मैदान गर्दीने गच्च भरले आहे, असे चित्र सभेत दिसले नाही.