पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमधील दोन डॉक्टरांकडून आपल्या एका सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. योगेश भानुशाला भद्रा आणि डॉ. अजय बागल कोट या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही सहकारी महिला डॉक्टरला वारंवार त्रास देत होते, त्यामुळे कंटाळून या महिलेने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर येथील सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सध्याच्या करोनाच्या संकट काळात एक २५ वर्षीय महिला डॉक्टर रुग्णसेवा करीत आहे. तिच्यासोबत डॉ. योगेश भानुशाला भद्रा आणि डॉ. अजय बागल कोट हे देखील अनेक दिवसापांसून येथे काम करीत आहेत. या दोघांनी तिला अनेक वेळा शरीर सुखाची मागणी केली होती. याविरोधात पीडित डॉक्टर महिलेने तेथील प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, आरोपी डॉक्टरांविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

तक्रार करुनही हे प्रकार थांबत नसल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित डॉक्टर महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून विनयभंगप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.