कल्पना आढाव गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मुलगा लहान होता तेव्हापासून त्याला उच्चशिक्षित करायचं अस त्यांचं स्वप्न होतं. अमित कल्पना आढाव असं मुलाचे नाव असून धुणी भांडी करून कल्पना आढाव यांनी त्याला उच्च शिक्षण दिले. अमितने बॅचलर्स इन फिजिओथेरपीचं शिक्षण पूर्ण केलं असून त्याला इंग्लंडमध्ये पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. पण यामध्ये आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत आहे.

कल्पना आढाव यांनी लोकसत्ता ऑनलाइनसमोर आपली व्यथा आणि संघर्ष मांडला. कल्पना आढाव आणि त्यांचा मुलगा अमित हे दोघे ही पिंपरीतील झोपडपट्टीमध्ये दहा बाय बाराच्या खोलीमध्ये राहतात. अमित हा केवळ एक महिन्याचा असताना त्याचे वडील दोघांना सोडून गेले. त्यानंतर अमितला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे कल्पना यांनी सांभाळले. उदरनिर्वाहासाठी कल्पना यांनी धुणी भांडी केली. अमितचं शिक्षण आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एक वेळ करायचं आणि दोन वेळ खायचं अशी परिस्थिती होती असं त्या सांगतात.

अत्यंत बेताची परिस्थिती असली तरी त्या खचल्या नाहीत. काही वर्षांनी त्या महानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीवर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत झाल्या. तेव्हा, त्यांना केवळ तीन हजार रुपये पगाराने सुरुवात करावी लागली होती. सध्या त्यांना १४ हजार रुपये पगार असून झोपटपट्टीत राहणाऱ्या कल्पना आढाव यांनी त्यांच्या मुलाला उच्च शिक्षित करून BPTH बॅचलर्स इन फिजिओथेरपीचं शिक्षण पूर्ण करण्यास हातभार लावला. अमित सध्या खासगी रुग्णालयात इंटर्नशीप करत आहे. त्याला पुढील शिक्षण म्हणजे स्पोर्ट्स एक्सरसाईज अँड मेडिसिनचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लडमधून संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, अमित आणि कल्पना आढाव यांच्यापुढे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचा डोंगर उभा आहे. जो त्यांना पार करून परदेशात मुलाला शिक्षणासाठी पाठवायचं आहे. मात्र काही झालं तरी परिस्थितीसमोर झुकायचं नाही असा निर्धार त्यांनी केला आहे.