शहरातील स्थानकांतून मध्यरात्रीपासूनच गाडय़ा बंद

वेतनाच्या प्रश्नावरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन तसेच पिंपरीतील वल्लभनगर स्थानकातून मध्यरात्रीपासूनच काही गाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या. संपाबाबत प्रवाशांना काहीही माहिती नसल्याने सकाळी स्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे दुपापर्यंत स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांना नियोजित प्रवास रद्द करावा लागला.

एसटीमध्ये कार्यरत असलेल्या कोणत्याही संघटनेने हा संप पुकारलेला नाही. मात्र, गुरुवारपासून समाज माध्यमांवर संपाबाबत आणि वेतनाच्या मागणीबाबत संदेश फिरत होते. या संदेशांमध्येही कोणत्याही संघटनेचे किंवा नेत्याचे नाव नव्हते. मात्र, त्याचा परिणाम म्हणून मध्यरात्रीपासूनच गाडय़ा आगारामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली होती. काहींनी एकमेकांना तोंडी संदेश देत संप करण्याबाबत सूचना दिल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सकाळपर्यंत सर्वच स्थानकातील गाडय़ा ठप्प झाल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच जाहीर झालेली वेतनवाढ संघटनेला विश्वासात न घेता केली आहे. त्यामुळे हा संप स्वयंस्फूर्तीने करण्यात आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

उन्हाळ्याच्या सुटय़ा संपून काही दिवसांतच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुण्याहून बाहेरगावी जाण्यासाठी सकाळी मोठय़ा प्रमाणावर प्रवासी स्थानकात दाखल झाले होते. मात्र, स्थानकातून कुठेच गाडी सोडली जात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. काही वेळाने तरी गाडी सोडली जाईल, या आशेने अनेक प्रवासी दुपापर्यंत स्थानकात बसून होते. संपादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी स्थानकांच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रवाशांची गरज लक्षात घेता खासगी वाहतूकदारांनी स्थानकाबाहेरील परिसरात मोठय़ा प्रमाणावर खासगी बस उपलब्ध करून दिल्या. मात्र, मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केली जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. प्रवासाची गरज असल्याने वाढीव भाडे देऊन प्रवाशांनी खासगी बसचा पर्याय स्वीकारला. अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होण्याबरोबरच एसटीचेही मोठे नुकसान झाले आहे. या संपाबाबत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.