मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिका फेटाळली

पुणे : वनाज ते रामवाडी  मेट्रोचा मार्ग बदलल्यानंतर या मार्गाची कामे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आणि कल्याणीनगरमधून करण्यास विरोध दर्शविणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सुधारित मार्गाचे काम करण्याचा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचा मार्गही मोकळा झाला असून मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे.

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिका मूळ आराखडय़ानुसार ऐतिहासिक आगाखान पॅलेस परिसरातून जाणार होती. मात्र आगाखान पॅलेसच्या परिसरात बांधकाम करण्यास राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने (नॅशनल मॉन्युमेंट मिशन) मनाई केली होती. त्यामुळे महामेट्रोकडून आगाखान पॅलेस परिसरातून जाणारा मेट्रोचा मार्ग बदलण्यात आला. कल्याणीनगरमधून हा मार्ग रामवाडीकडे नेण्याचा आराखडाही महामेट्रोकडून करण्यात आला होता. कल्याणीनगरमधून जाणाऱ्या या सुधारित मार्गामुळे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याला हानी पोहोचणार असल्यामुळे त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यापूर्वीही परिसरातील स्थानिक नागरिकांनी कल्याणीनगरमधून पर्यायी मार्गाने मेट्रा रामवाडीपर्यंत नेण्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्या न्यायालयाने फेटाळल्या होता. मात्र मेट्रोचे काम सुरु असतानाच मेट्रो मार्गातील बदल अद्यापही अधिसूचित झालेला नाही. तरीही प्रकल्पाचे काम सुरु आहे, असा आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेसंदर्भात याचिकाकर्त्यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयाकडून यापूर्वी ऐकून घेण्यात आली होती.  कल्याणीनगरमधून जाणाऱ्या पर्यायी मार्गाची अधिसूचना अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही, त्यामुळे मेट्रोला या परिसरात काम करता येणार नाही, असे सांगत महामेट्रोला काम करण्यास मनाई आदेश होते. मात्र त्यानंतर महामेट्रोची बाजू ऐकून घेतल्यानंतर याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे या परिसरात काम करण्याचा महामेट्रोचा मार्गही मोकळा झाला असून मेट्रो प्रकल्पालाही वेग मिळणार आहे, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.