पर्यावरणवाद्यांचा आग्रह आणि न्यायालयाच्या तत्कालीन निर्णयामुळेच पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात दिवसेंदिवस बळींची संख्या वाढत असल्याचा आरोप प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. द्रुतगती मार्गावरील अशास्त्रीय पद्धतीच्या कामांचा सविस्तर अभ्यास करून त्या अहवालाच्या आधारे आपण न्यायालयीन लढा देणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

द्रुतगती मार्गावर २६ मे रोजी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रेलरने डीएसके यांच्या मोटारीला धडक दिली होती. त्यात चालकाचा मृत्यू झाला होता. जखमी डीएसकेंना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्यानंतर, द्रुतगती मार्गावरील अशास्त्रीय कामांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की पर्यावरणवाद्यांमुळे या मार्गाच्या कामाला स्थगिती देण्यात आल्यानंतर घाट विभागामध्ये एक मार्गिका कमी करण्यावर तडजोड झाली आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेची असणारी ‘नो मॅन लॅन्ड’चीच मार्गिका कमी करण्यात आली. तोच निर्णय आता अनेकांचा बळी घेतो आहे. त्याबरोबरीनेच रस्त्यासाठीची डोंगरफोड, वळणे व उतार अशास्त्रीय पद्धतीचे आहेत. जगभरातील द्रुतगती मार्ग पाहिले, तर दोन्ही दिशेच्या मार्गाच्या मध्ये सुमारे साडेदहा फुटांची ‘नो मॅन लॅन्ड’ आवश्यक आहे. या जागेत विरुद्ध दिशेच्या गाडय़ांच्या दिव्यांच्या त्रास होऊ नये म्हणून दाट व दणकट झाडी, सुरक्षिततेच्या दृष्टीने रोप व खोल खड्डा, अशी रचना हवी असते. या रचनेतून एका बाजूचे वाहन दुसऱ्या दिशेच्या मार्गावर येण्यास अटकाव होतो. द्रुतगतीवर सर्वच ठिकाणी ‘नो मॅन लॅन्ड’मध्ये झाडे नव्हे, तर कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. इतर रचनाही शास्त्रीय नाहीत. दुसरीकडे घाट विभागामध्ये पर्यावरणवाद्यांनी कामाला आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाच्या साक्षीने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात घाट विभागातील एक मार्गिका कमी करण्याची तडजोड झाली व मुख्य म्हणजे ‘नो मॅन लॅन्ड’चीच मार्गिका कमी करण्यात आली. घाट क्षेत्रातील उतार व वळणाच्या जागाही तांत्रिकदृष्टय़ा योग्य नाहीत. वळणाच्या ठिकाणी रस्ता रुंद हवा, ही साधी गोष्टही पाळली गेली नाही. महत्त्वाचे म्हणजे सिमेंटचा रस्ता करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. द्रुतगती मार्ग करताना वेगवेगळ्या कंत्राटदारांनी कामे केली. त्यातून काही भागात रस्ता समतल नाही. दर दहा फुटाला गाडी आदळत चालते. गाडीचा वेग व सिमेंटचा रस्ता, तसेच आदळण्याची प्रक्रिया लक्षात घेता टायर फुटून अपघात होतात. रस्ता करताना डोंगर उभा कापत नाहीत. तो ३५ डीग्रीमध्ये टप्प्याटप्प्याने कापावा लागतो. द्रुतगतीवर हे दिसत नाही. या तांत्रिक गडबडींबाबत खासगी सर्वेक्षण करून त्या आधारे न्यायालयीन लढा देऊ, असा निर्धार डीएसके यांनी व्यक्त केला.