गाडीविना प्रथमच वाढदिवस साजरा

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची लाडकी गाडी आणि ‘सेकंड होम’ असलेली डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीने सोमवारी (१ जून) ९० वर्षे पूर्ण करून ९१ व्या वर्षांत पदार्पण केले. करोनातील टाळेबंदीमुळे रेल्वे बंद असल्याने यंदा प्रथमच गाडीविना वाढदिवस साजरा करण्यात आला.

पुणे-मुंबई प्रवासासाठी १ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन अल्पावधीतच लोकप्रिय झाली. लिम्का बुकमध्ये नोंद झालेली आणि ‘आयएसओ’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळालेली ही गाडी प्रवाशांची सर्वात लाडकी गाडी ठरली आहे.  दरवर्षी १ जूनला या गाडीचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात येतो. आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे प्रवासी या कार्यक्रमात सहभाग घेतात. यंदा ही गाडी ९० वर्षे पूर्ण करून ९१ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने प्रवाशांकडून वाढदिवसाची योजना आखण्यात आली होती. मुंबईत अडकून पडलेली ही गाडी १ जूनला पुण्यात आणण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही.

डेक्कन क्वीनच्या वाढदिवसासाठी दरवर्षीप्रमाणे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी पुढाकर घेतला. गाडी सुरू नसतानाही शहा यांच्या नेतृत्वाखाली पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रवाशांची ही लाडकी गाडी लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी इच्छाही प्रवाशांनी या वेळी व्यक्त केली.

‘डेक्कन क्वीन’ने सोमवारी ९१ व्या वर्षांत पदार्पण केले. करोनामुळे ही गाडी बंद असतानाही रेल्वे प्रवासी ग्रुपच्या पुढाकाराने पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.