मुंबई महापालिका वगळता पुणे, िपपरी-चिंचवडसह उर्वरित सर्व महापालिकांच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचे राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध करण्यात आले आहे. चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये होणारी महापालिका निवडणूक कोणत्या पद्धतीने होणार यासंबंधीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक वॉर्ड, का दोन सदस्यांचा एक प्रभाग, का चार सदस्यांचा प्रभाग करायचा याबाबत मंत्रिमंडळाने एक उपसमिती नेमली होती. या उपसमितीने मुंबई महापालिका वगळता उर्वरित सर्व आगामी महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर याबाबतचे राजपत्र १९ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांमध्ये किमान चार आणि जास्तीत जास्त पाच नगरसेवकांचा एक प्रभाग केला जाणार असल्याचे या राजपत्रात म्हटले आहे. पुणे आणि िपपरी-चिंचवड महापालिकेमध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग असेल.

पुणे महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला होता. मात्र, त्यात बदल करून सन २००७ सालची निवडणूक पुन्हा वॉर्ड पद्धतीने घेण्यात आली. या पद्धतीत पुन्हा बदल करून २०१२ सालची निवडणूक दोन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने घेण्यात आली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार फेबुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आता चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला आहे.

पुण्यात ३८ प्रभाग शक्य

पुणे महापालिका निवडणुकीचा विचार करता आगामी निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक या पद्धतीचे ३८ प्रभाग तयार केले जातील. प्रत्येक प्रभागातील मतदारांची संख्या सुमारे ८० ते ९० हजार इतकी असेल.