मुस्लिम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे. तसेच गोरक्षा, लव जिहाद, मुस्लिम व्यक्तींची समूहाकडून (मॉब लिंचिंग) होणाऱ्या हत्या रोखाव्यात यासह अनेक मागण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वतीने मुस्लिम मूक महामोर्चा काढण्यात आला. गोळीबार मैदान ते विधानभवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

पुण्यातील गोळीबार मैदानावरून निघालेला मूकमोर्चा सेव्हन लव्ह चौकापासून रामोशी गेट, केईएम हॉस्पिटल, नरपतगिरी चौक, जिल्हा परिषदेची जुनी इमारत तेथून पुढे विधानभवनासमोर मोर्चाचा समारोप झाला.

धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, यासह विविध मागण्याचे फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या मागण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे आणि यावर योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली. तसेच या मोर्चात पुणे शहर आणि जिल्ह्यातून अनेक नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.