News Flash

मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात!

आज मधमाशी दिन : संख्येत मोठी घट; निसर्गचक्राला धोका

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| चिन्मय पाटणकर

आज मधमाशी दिन : संख्येत मोठी घट; निसर्गचक्राला धोका

‘मधमाशा पृथ्वीवरून नामशेष झाल्या तर माणूस फक्त चार वर्षे जगू शकेल’ हे शब्द आहेत साक्षात अल्बर्ट आइनस्टाइन यांचे.. आइन्सस्टाइन यांचे हे शब्द पुढील काही वर्षांत खरे होण्याची भीती निर्माण झाली आहे. बेसुमार वृक्षतोड, वाढते शहरीकरण, काँक्रीटीकरण, रासायनिक खतांचा वापर, मोबाइल टॉवर्समुळे निर्माण होणारे उत्सर्जन या कारणांमुळे मधमाश्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, निसर्गचक्राला धोका निर्माण झाला आहे.

जगात २० मे हा दिवस मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. या पाश्र्वभूमीवर, मधमाश्यांची दाहक स्थिती समोर आली आहे. मधमाशी हा निसर्गचक्रातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परागीभवनाच्या प्रक्रियेत मधमाश्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र मधमाश्यांची संख्या कमी होत असल्याने परागीभवनाची प्रक्रिया थांबते आहे. आधुनिकतेच्या आणि विकासाच्या नावाखाली होत असलेले ‘उद्योग’ मधमाश्यांसाठी हानीकारक ठरत आहेत. अधिक उत्पादन घेण्यासाठीची कीटकनाशके, जंगलतोड यामुळे मधमाश्यांचे अधिवासच संपुष्टात आले आहेत. सातत्याने बदलणारी पीक पद्धती आणि मोबाइल टॉवर्सचाही मधमाश्यांना फटका बसतो. जंगलतोडीमुळे मधमाश्यांचे शहरांत स्थलांतर वाढले आहे. मात्र शहरांतील काँक्रीटीकरण आणि प्रदूषणाचाही मधमाश्यांवर परिणाम होतो. त्यामुळे सगळ्याच बाजूंनी मधमाश्यांची कोंडी झाली असून, येत्या काही काळात मधमाशी या प्रजातीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय मधमाशी पालन केंद्राच्या संचालिका लक्ष्मी राव यांनी मधमाश्यांच्या घटत्या प्रमाणाविषयी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘मधमाश्यांचे घटते प्रमाण हे भीतीदायक वास्तव आहे. मधमाशी हा जैवविविधतेतील खूप महत्त्वाचा घटक आहे. एकेकाळी पश्चिम घाट, पुणे आणि परिसरात मधमाश्या मोठय़ा प्रमाणात आढळून यायच्या. कारण तेव्हा त्यांना अनुकूल असे वातावरण होते. आजची स्थिती तशी नाही. शहरीकरण वाढले आहे, जंगले नष्ट होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आपण रोज जे जेवतो, त्यातील एकतृतीयांश भाग मधमाश्यांमुळे आपल्याला मिळतो. शेती उत्पादनात मधमाश्यांमुळे ४० ते ५० टक्केवाढ होते. जंगले आणि शेतांमधील मधमाश्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत.  शहरांतील प्रदूषण आणि काँक्रीटीकरणाचाही त्यांच्यावर विपरीत परिणाम होते. गेली काही वर्षे मी नैसर्गिक पद्धतीने मधमाश्यांचे पोळे काढण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.  – अमित गोडसे, मधमाशी मित्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:51 am

Web Title: national honey bee day
Next Stories
1 येडियुरप्पा सरकार कोसळल्यानंतर पुण्यात काँग्रेसकडून लाडू आणि पेढे वाटून जल्लोष
2 जन्मदात्या आई आणि पाच वर्षांच्या चिमुकल्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार
3 ‘प्लास्टिक बंदी’ची सूचना नाही! 
Just Now!
X