साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे सांगून याबाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. दरम्यान अजित पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी यावर उत्तर दिलं असून विरोधकांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळी आपल्याला भेटत आहेत. त्यावरून अनेक राजकीय चर्चा होत आहेत असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “मला काल शिवेंद्रसिंहराजे भेटले, आज परिचारक भेटले. हे जरी वेगळया राजकीय पक्षात असले तरी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे”.

“सोलापूर जिल्ह्याचं एक शिष्टमंडळ आलं होतं. त्यामध्ये शहाजी बापू, दिपक साळुंके असे अनेक मान्यवर आले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आज वेळ घेतली होती. त्यांचे काही पाण्याबाबत प्रश्न आहेत. त्यामुळे ते आले होते. शेवटी आम्हीदेखील विरोधी पक्षामध्ये असताना आमच्या कामांसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना भेटत होतो. आम्ही संबधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटायचो. ही परंपरा आजची नाही, तर शंकरराव चव्हाण साहेबांपासून चालत आलेली आहे. त्याला काही वेगळं स्वरुप देण्याच कारण नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले

“ज्यावेळी काय करायचं ते जाहीरपणे सांगितलं जाईल. आता अमुक अमुक त्या त्या पक्षात येतायत, मग वाजवा किती वाजवायचं ते,” असं अजित पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का-
“आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचे आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. तसंच धनंजय मुंडे साहेबांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ते सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता,” असा टोला अजित पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन विरोधकांना लगावला.