News Flash

शरद पवार – प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

"....त्यापैकीच ही भेट आहे," अजित पवारांनी सांगितली शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागील शक्यता

"....त्यापैकीच ही भेट आहे," अजित पवारांनी सांगितली शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागील शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतरही प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विरोधकांकडून २०२४ मध्ये भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “प्रशांत किशोर यांनी मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही”.

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

“शरद पवारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट आहे का ? असं विचारण्यात आलं असता, त्यांनीच आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं आहे म्हणत अजित पवारांना विषयाला पूर्णविराम दिला.

आषाढी वारीसंदर्भात जाहीर केला निर्णय
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

“गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय
पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:31 pm

Web Title: ncp ajit pawar on sharad pawar prashant kishor meet svk 88 sgy 87
Next Stories
1 पुणेकरांना दिलासा पण…; मॉल्स उघडणार, दुकानं ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय
2 Pune MIDC Fire : मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार; अजित पवारांची घेणार भेट
3 पुणे : नव्या Lamborghini मधून फेरफटका मारण्यासाठी तळजाईच्या पायथ्याशी आला अन्….
Just Now!
X