वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची उपस्थिती.. उत्साही कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा.. जामिनावर सुटल्यानंतर प्रथमच भाषणासाठी उभे राहिलेल्या छगन भुजबळ यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र उगारणारी नेत्यांची भाषणे.. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाचा समारोप करताना राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. या मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रविवारची सुट्टी असल्याने घराबाहेर पडलेले नागरिक हैराण झाले.

राष्ट्रवादीच्या १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप मेळाव्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, मधुकर कुकडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, मधुकर पिचड, फौजिया खान, माजी खासदार, निवेदिता माने, चित्रा वाघ यांच्यासह शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे व्यासपीठावर होते. मात्र, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच या मेळाव्याचे आकर्षण केंद्र ठरले.

या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हल्लाबोल आंदोलनाच्या फ्लेक्समुळे वातावरण निर्मिती केली होती. ना. सी. फडके चौकापासूनच फलक कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारपासूनच शहराच्या विविध भागांतून गाडय़ा भरून माणसांना शिंदे हायस्कूल या ठिकाणी आणण्यात आले. शिंदे हायस्कूलच्या प्रवेशद्वारापाशी वर्धापनदिनाचा पेढा आणि पाण्याची बाटली देऊन कार्यकर्त्यांना मैदानावर सोडले गेले. स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप आणि अश्विनी कदम यांनी मेळाव्याची जय्यत तयारी केली होती. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणारे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यातील एका फ्लेक्सवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे छायाचित्र लावण्यात आले होते.

पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शरद पवार यांनी भाषण संपविले आणि मेळाव्याची सांगता झाली. त्यानंतर सर्वाची तेथून बाहेर पडण्यासाठी एकच लगबग सुरू झाली. या साऱ्या गोंधळामुळे सहकारनगर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. रविवारची सुट्टी घराबाहेर घालविण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. गजानन महाराज मंदिर चौकापासून सहकारनगर परिसराकडे जाण्यासाठी पोलिसांनी वाहनांना रस्ता बंद केल्यामुळे या भागात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.