दिलीप वळसे पाटील लोकसभेच्या रिंगणात नाहीत

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरूच आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यंदाही लोकसभेच्या रिंगणात नसतील, असे शिरूर लोकसभेबाबतच्या प्राथमिक चर्चेत दिसून आले. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ही बैठक झाली. त्यात  पुणे जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघातील सद्यपरिस्थिती पवारांनी जाणून घेतली. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. या दोन्ही जागाजिंकण्याचा राष्ट्र्नवादीचा निर्धार असून त्यासाठी सक्षम उमेदवार हवेत म्हणून राष्ट्रवादीकडून शोध सुरू आहे.

शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मावळसाठी इच्छुक असल्याचे नेत्यांना सांगितले. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली ताकद असल्याचे वाघेरे यांनी मागील आकडेवारीसह नमूद केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांचे नाव मावळसाठी चर्चेत आणण्यात आले होते. मात्र, शरद पवार यांनी त्या नावास अनुकूलता दाखवली नाही. शिरूर मतदारसंघातील चर्चेत माजी आमदार विलास लांडे, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, किशोर दांगट, देवदत्त निकम सहभागी झाले. वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी ते लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक नसल्याचे या वेळी दिसून आले.