राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या सामोरे जावे लागत आहे. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यावर सरकारकडून काही उपाय योजना करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्याच्या अनेक भागातील दुष्काळी भागाचा दौरा करीत आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन संवाद साधत आहे. यातून प्रश्न आणि समस्या सुटणार नाही, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मंगळवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यावर आम्ही सर्व मदत तत्काळ दिल्या. मात्र सध्याच्या सरकारकडून राज्यातील जनता होरपळून निघत असताना देखील जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून दिले जात नाही. या सरकारमधील मंत्री आणि अधिकारी बाहेर फिरायला गेले आहेत. या सरकारला काम करण्याची मानसिकता नसल्याने प्रत्येक कामाला अटी लावण्याचे काम केले जात आहे. अशा शब्दात भाजपवर त्यांनी निशाणा साधला.