केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादीने अनोखे अंदोलन केले. पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे नागरिकांना गोवऱ्या वाटून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला. ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चाकणकर म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांना या सरकारच्या काळात जगणे कठीण झाले असून आता त्यात गॅस दरवाढीची भर पडली आहे. सरकारने दरवाढ मागे न घेतल्यास यापुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी चेतन तुपे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. सत्तेत आल्यापासून भाजपने जनतेच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतलेले नाहीत. केवळ उद्योगपतींच्या बाजूने निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. ही दरवाढ म्हणजे जाहिरातीवर खर्च करण्यासाठी सामान्यांकडून केलेली वसूली आहे, अशा शब्दांत त्यांनी दरवाढीच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या आंदोलनास महिलांचा अल्प प्रतिसाद

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली घरगुती गॅस दरवाढीविरोधात महिलांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन केले. या आंदोलनात माजी महापौर अपर्णा डोके या देखील सहभागी झाल्या होत्या.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘विकास वेडा झाला, माझा संसार उदध्वस्त झाला’ ‘बया…बया…..गॅस लय महागला’, ‘बया…बया कसली ही महागाई’ अशा घोषणा देऊन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बाल्लेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गॅस दरवाढीविरोधात झालेल्या आंदोलनात परिसरातील महिलांनी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारविरोधातील हे आंदोलन अपयशी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसते आहे.