‘हॅट्ट्रिक’ साधण्याचा पिंपरी शहराध्यक्षांचा दावा
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांकडून चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी, पिंपरीत दोनचा असो की चार सदस्यांचा प्रभाग असो, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ साधणार, असा विश्वास शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक आकुर्डीतील ‘कुंदन’ येथे पार पडली, तेव्हा पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले,की सध्या राज्य शासन महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीसाठी आग्रही आहे, असे दिसते. तसे केल्यास भाजपला फायदा होईल, असे त्यांना वाटते. मात्र, मुख्यमंत्री तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हा भ्रम आहे. दोनचा असो, चारचा असो की त्यापेक्षा अधिक सदस्यांचा प्रभाग असो; पिंपरी पालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादीचजिंकणार आणि सत्तेची हॅट्ट्रिक करणार आहे. शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या जोरावर नागरिक पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या हातात कारभार देतील, असा विश्वास असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे.