फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना त्यांच्या मजल्यावर किंवा त्यांच्या शेजारी कोण राहतो याची देखील माहिती नसते.. कोण काय करतो याकडेही लक्ष दिले जात नाही, पण ‘आपला शेजारी हाच खरा पहारेकरी’ असतो याची प्रचिती चंदननगर येथील एका कुटुंबाला आली आणि शेजाऱ्याने दाखवलेल्या जागरूकतेमुळे चोरटा पोलिसांच्या जाळय़ात सापडला.
चंदननगरमध्ये राहणाऱ्या मारियाना यांचे घर बंद होते. या घरात मध्यरात्री चोरटा घुसल्याचे लक्षात येताच त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून ही माहिती दिली आणि ती सदनिका बाहेरून बंद करून घेतली. ही माहिती मिळताच काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला सदनिकेत जाऊन पकडले. नव्यानेच सुरू झालेल्या चंदननगर पोलीस ठाण्याने उघडकीस आणलेला हा पहिलाच गुन्हा आहे.
अंकुश लक्ष्मण लष्करे (वय २६, रा. राजनगर ओटा स्कीम, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लष्करे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इतरही काही ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत रुबेन थॉमस मारियाना (वय ३८, रा. सत्यनारायण सोसायटी, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारियाना या एका आयटी कंपनीत काम करतात. बुधवारी रात्री त्या बहिणीकडे जेवायला गेल्या होत्या. त्या घरी नसल्याची कल्पना त्यांच्या शेजाऱ्यांना होती. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास मारियाना यांच्या शेजारी राहणाऱ्यांना शेजारच्या सदनिकेत काहीतरी वाजल्याचा आवाज आला. त्यांना संशय आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता मारियाना यांच्या सदनिकेत चोरटा शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांतच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर, पोलीस कर्मचारी ए. के. गाढवे, मानेज नेटक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कडी उघडून आत शिरून लष्करेला घरफोडी करताना पकडले. त्याच्याकडून एक मंगळसूत्र व एक हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी मारियाना यांना दिल्यानंतर त्या घरी पोहोचल्या.

अटक केलेला अंकुश लष्करे हा सराईत गुन्हेगार असून बंद असलेली सदनिका पाहून घरफोडी करण्यासाठी घुसला असता त्याला पकडण्यात आले. त्याने चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास सुरू आहे. नवीन पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर उघडकीस आणलेला हा पहिलाच गुन्हा आहे.
अनिल पाथरूडकर
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे