आठ दिवसांच्या चिमुकलीला पिंपरी रेल्वे स्थानकात सोडून आईने पळ काढल्याची घटना शुक्रवारी घडली. एका महिला प्रवाशाला स्थानकावरील बाकड्यावर आठ दिवसाची चिमुकली दिसली आणि तिने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

नीलम गायकवाड या शुक्रवारी नेहमीप्रमाणे नोकरीसाठी निघाल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर लोखंडी बाकड्यावर त्यांना लहान बाळ दिसले. बाळा शेजारी पिशवी, शाल, गुलाबी रंगाची टोपी, दुधाची बाटली ठेवलेली होती. नीलम गायकवाड यांनी आजूबाजूला बाळाची आई आहे का याचा शोध घेतला. मात्र तिथे कोणीही नसल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या बाळाला पुण्यातील बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलीला रस्त्यावर सोडून दिल्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. ७ फेब्रुवारी रोजी मारुंजी येथील मोकळ्या मैदानात दोन दिवसांच्या चिमुकलीला भर उन्हात सोडून आईने पळ काढला होता.