13 December 2017

News Flash

पुणे स्थानकात मार्चपर्यंत नवा रेल्वे पादचारी पूल

प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी स्थानकातून सुटणाऱ्या व स्थानकात येणाऱ्या गाडय़ांची संख्या मोठी असते.

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 13, 2017 3:47 AM

रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध; पुलांना जोडण्यासाठी ‘स्काय वॉक’ही!

पुणे रेल्वे स्थानकावर सर्व फलाटांना जोडणारा पादचारी पूल ९२ वर्षांचा झाला असल्याने वाढलेल्या प्रवासी संख्येमध्ये तो अपुरा ठरतो आहे. अशा परिस्थितीत नव्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणात निधीची उपलब्धता झाली असून, येत्या मार्च महिन्यापर्यंत नवा पूल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर रेल्वे पादचारी पुलावरील घटनेनंतर पुण्यातील पुलाच्या कामाबाबत ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

एल्फिन्स्टन स्थानकावरील घटनेनंतर पुण्यातील पादचारी पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकसत्ता पुणे’ सहदैनिकात ३० सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आले होते. एल्फिन्स्टन स्थानकावरील भीषण घटनेनंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्थानक असलेल्या पुणे स्थानकातील पादचारी पुलाचा प्रश्नही ऐरणीवर आला. पुणे रेल्वे स्थानकाच्या सध्याच्या ऐतिहासिक इमारतीचे बांधकाम १९२२ मध्ये सुरू करण्यात आले होते. त्यापूर्वीही स्थानकावर पादचारी पूल होता. पुढे फलाटांची संख्या वाढत असताना पुलाची लांबीही वाढत गेली. १९२५ मध्ये नव्या स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. त्याच वेळी सर्व स्थानकांना जोडणारा व सध्या अस्तित्वात असलेला पूलही तयार करण्यात आला होता. ९२ वर्षांपूर्वी स्थानकावर सुमारे वीस गाडय़ांची ये-जा होती. सध्याची स्थिती लक्षात घेता मालगाडय़ा वगळता स्थानकात पुणे-लोणावळा लोकलच्या ४४ फेऱ्यांबरोबरच इतर सुमारे दोनशे गाडय़ांची स्थानकात ये-जा आहे. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे.

प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी स्थानकातून सुटणाऱ्या व स्थानकात येणाऱ्या गाडय़ांची संख्या मोठी असते. सर्व स्थानकांना जोडणारा एकच पादचारी पूल असल्याने या पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे हा पूल काहीसा हलतोही. त्यामुळे हा पूल कधी धोकादायक ठरेल, हे सांगता येत नसल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे नव्या पुलाची नितांत गरज आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या फलाटाला जोडणारा नवा पूल आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही. प्रवासी संख्या झपाटय़ाने वाढत असताना सर्व फलाटांना जोडणाऱ्या नव्या पर्यायी पुलाची मागणी होत असताना या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे.

सर्व फलाटांना जोडणाऱ्या जुन्या पुलाला समांतर नव्या पुलाचे काम करण्यासाठी काही प्रमाणात निधीची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने सुरू होऊ शकणार आहे. स्थानकातील पादचारी पुलांना जोडण्यासाठी स्काय वॉकचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जुन्या पादचारी पुलाच्या समांतर नवा पादचारी पूल आणि त्यांना जोडणाऱ्या स्काय वॉकसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या माध्यमातून येत्या मार्चपर्यंत हे काम मार्गी लावण्याचे नियोजन आहे. या कामासाठी एक दिवस स्थानकातील रेल्वे गाडय़ांची वाहतूक बंद ठेवण्याची परवानगी मिळण्याची विनंतीही रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे.

मिलिंद देऊस्कर, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक

First Published on October 13, 2017 3:47 am

Web Title: new foot over bridge at pune station