देशभरातील अनेकांना गंडा; दोन कोटी ९९ लाखांची फसवणूक

ब्रिटिश लॉटरी लागल्याच्या आमिषाने कर्वेनगर येथील एका महिलेला सोळा लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या नायजेरियन नागरिकाला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिल्लीत पकडले. प्रवासी व्हिसावर आलेल्या नायजेरियन भामटय़ाने देशभरातील शंभर नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून दोन कोटी ९९ लाख रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

इग्वे फेस्टस् अब्राहम (वय ४३, मूळ रा. प्रिन्स फगिना स्ट्रीट, लागोस, नायजेरिया, सध्या रा. मालवीय नगर, नवी दिल्ली ) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन भामटय़ाचे नाव आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कर्वेनगमध्ये राहणाऱ्या एका महिलेला इग्वे याने ईमेल पाठविला. हजारो पौंडाची ब्रिटिश लॉटरी लागल्याचे आमिष त्याने दाखविले, तसेच भारतीय चलनात तुम्हाला चार कोटी ९२ लाख रुपये मिळणार आहेत, असे त्याने महिलेला सांगितले होते. इग्वे याने दाखविलेल्या आमिषाला महिला बळी पडली. त्यानंतर इग्वे याने डॉ. रिचर्ड या नावाने महिलेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्याने महिलेला एका बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. वेगवेगळी कारणे देऊन त्याने तिच्याकडून पैसे उकळले. ६ डिसेंबर २०१५ रोजी डॉ. रिचर्ड तुम्हाला पुण्यात भेटण्यास येणार असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या राहण्याची सोय तुम्हाला करावी लागेल, असेही त्याने सांगितले होते.

फग्युर्सन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये इग्वे याच्या राहण्याची व्यवस्था महिलेने केली. तेथे महिलेने त्याची भेटदेखील घेतली. तेथे इग्वे याने महिलेला बॅग दाखविली. त्यामध्ये परकीय चलन  होते. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. परकीय चलनांच्या बंडलामधून त्याने चार नोटा काढल्या आणि त्या महिलेला भेट दिल्या. इग्वे याने एका रसायनाच्या बाटलीत नोटा बुचकळल्या. नोटा स्वच्छ करण्यासाठी आणखी रसायनाची गरज लागणार आहे. ते ब्रिटनहून मागवावे लागते, अशी बतावणी त्याने केली. दरम्यान महिलेने इग्वे याने दिलेले परकीय चलन वटविले. ते खरे आहे याची खात्री पटल्यानंतर तिने वेगवेगळ्या बँकेत १६ लाख १८ हजार रुपये भरले. मात्र लॉटरीचे पैसे तिला मिळालेच नाहीत. त्यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार दिली. त्याअनुषंगाने या गुन्ह्य़ाचा सायबर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला होता. इग्वे याने पाठविलेला ईमेल आणि फसवणूक करण्यासाठी वापरेलेली बँकखात्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी विश्लेषण केले. महिलेने दिलेल्या छायाचित्रावरुन पोलिसांच्या पथकाने त्याला नवी दिल्लीत सापळा रचून पकडले.

पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक संजय ढेंगे, विजयमाला पवार, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, मोहन साळवी, अजित कु ऱ्हे, अस्लम अत्तार, राजकु मार जाबा, राजू भिसे, बाबासाहेब कराळे, विजय पाटील, शिरीष गावडे, अमित औचरे, अविनाश दरवडे, अश्विन कुमकर, तौसिफ मुल्ला, नितीन चांदणे, दीपक माने, भास्कर भारती, उज्ज्वला तांबे, सरिता वेताळ यांनी ही कारवाई केली.