News Flash

नऊ पानांमध्ये १२० हून अधिक व्याकरणाच्या चुका!

विद्यापीठाची अधिसभा शनिवारी (१४ डिसेंबर) आयोजित करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेची कार्यक्रमपत्रिका

मराठी भाषा-संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधनाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या कार्यक्रमपत्रिकेतील नऊ पानांमध्ये १२० हून अधिक व्याकरणाच्या चुका असल्याचे दिसून आले आहे. कार्यक्रमपत्रिकेत सदोष वाक्यरचनेसह शब्दांचे ऱ्हस्व-दीर्घही चुकले असून, विद्यापीठाकडूनच मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यापीठाची अधिसभा शनिवारी (१४ डिसेंबर) आयोजित करण्यात आली आहे. या अधिसभेसाठीची कार्यक्रमपत्रिका विद्यापीठाकडून निश्चित करण्यात आली आहे. या अधिसभेत चर्चा करण्यासाठी सदस्यांकडून विविध विषयांवरील ठराव मांडण्यात आले आहेत. मात्र, विद्यापीठाने निश्चित केलेल्या कार्यक्रमपत्रिकेची तपासणी केली असता त्यात व्याकरणाच्या आणि टंकलेखनाच्या अनेक चुका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी सुरू झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कार्यक्रमपत्रिकेतील मजकुरात ऱ्हस्व-दीर्घच्या चुका, वाक्यांची रचना चुकणे असे प्रकार झाले आहेत. उदाहरणार्थ, निर्णयानुसार हा शब्द ‘निर्णयानूसार’, जुलै हा शब्द ‘जूलै’, पूर्ण हा शब्द ‘पुर्ण’ अशा प्रकारे लिहिण्यात आला आहे. असे अनेक शब्द चुकले आहेत. त्याशिवाय काही टंकलेखनाच्या चुका असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे कार्यक्रमपत्रिका निश्चित करताना त्याची काळजीपूर्वक तपासणी होते की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनातील मंडळींना मराठी व्याकरणाचे किमान प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण विद्यापीठाच्या वतीने पाठवले जाणारे प्रत्येक पत्र, छापील पत्रक विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करते. मूलभूत व्याकरणाच्या चुका असलेल्या कागदपत्रांमुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार आहे. त्यामुळे या विद्यापीठातील सर्व शिक्षित-उच्चशिक्षित मंडळींनी केवळ शिक्षित न राहता सुशिक्षितपणाची भूमिका घ्यावी. मूलभूत व्याकरणाच्या चुका या पुढे तरी होऊ नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा हा सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. विद्यापीठाचाच एक माजी विद्यार्थी म्हणून मला ही काळजीची बाब वाटते. – अनिल गोरे, मराठी अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 6:16 am

Web Title: nine page grammar mistakes university program akp 94
Next Stories
1 पुरंदर विमानतळासाठीच्या हरकती, सूचनांना ‘ब्रेक’
2 कात्रज टेकडी  फोडणारे मोकाट
3 रस्त्याच्या रखडपट्टीने आरोग्यालाही धोका
Just Now!
X