शहरातील व्यापाऱ्यांची भूमिका

पुणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असून पुन्हा टाळेबंदी  लागू केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील आठ ते दहा दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले. मात्र, सरसकट टाळेबंदी लागू करण्याचा विचार हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल, असे मत शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मार्च महिन्यात शहरात निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर टाळेबंदीच लागू करण्यात आली. टाळेबंदी लागू झाल्यानंतर शहरातील अत्यावश्यक सेवा तसेच अन्नधान्यांची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुन्हा टाळेबंदी किंवा कठोर उपाययोजना करण्याचा प्रस्ताव विचारात आहे. सरसकट टाळेबंदीचा निर्णय परवडणारा नाही, असे मत पुणे शहर व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

दुकानाचे भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचे वेतन अशा समस्यांना टाळेबंदीत सामोरे जावे लागले. निर्बंध शिथिल झाल्याने व्यवहार काही अंशी सुरळीत झाले. मुखपट्टी नसल्यास दुकानात प्रवेश देऊ नये, नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. – महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी कठोर निर्बंध जरूर लादावेत. नागरिकांसह व्यापाऱ्यांनीही  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मात्र, अजूनही व्यापार तेवढा गतीने होत नसल्याने सरसकट टाळेबंदीचा प्रस्ताव कोणाच्याही हिताचा नाही. – पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर, मार्केटयार्ड