अजित पवार यांची सत्ताधारी भाजपवर टीका

खोटी आश्वासने देऊन पिंपरी पालिकेची सत्ता भाजपने मिळवली. मात्र, दीड वर्षांत भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. पालिकेत नियोजनबद्ध भ्रष्टाचार सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपचा कोणीही ज्येष्ठ नेता येथील प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शहराला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आकुर्डीत पत्रकार परिषदेत बोलताना केली.

पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. शहर गलिच्छ झाले आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. जिल्हाधिकारी म्हणून त्यांचे काम चांगले होते. पिंपरीचे आयुक्त म्हणून ते अपयशी ठरले आहेत. हर्डीकर यांचा अजिबात वचक नाही. स्मार्ट सिटी म्हणजे शहराचा एक कोपरा स्मार्ट करणे नव्हे. भाजपच्या पोकळ घोषणा असून प्रत्यक्षात भोंगळ कारभार आहे. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते. पाण्याची परिस्थिती बिकट आहे. पालिका रुग्णालयांमध्ये औषधे मिळत नाहीत. खर्चिक सल्लागारांचे पीक आले आहे.

मतविभागणी टाळण्यासाठी समविचारी एकत्र

आगामी निवडणुकांसाठी जातीयवादी पक्ष वगळून समविचारी पक्ष एकत्र येणार असल्याचे अजित पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. मतविभागणीचा फायदा भाजपला होऊ न देण्याची तसेच तुटेपर्यंत न ताणता व्यवहार्य तोडगा काढण्याची आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. राफेलप्रकरणी मोदी मौन का बाळगून आहेत. नक्की काहीतरी पाणी मुरते आहे, असे पवार म्हणाले.