देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये महाराष्ट्रातील संतांचे योगदान मोठे आहे. मात्र, त्या प्रमाणात केंद्रीय स्तरावरील इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये या संतांना स्थान देण्यात आलेले नाही, असा आक्षेप इतिहास तज्ज्ञ आणि संतसाहित्याच्या अभ्यासकांनी ‘मराठी संतांचे राष्ट्रीय योगदान आणि केंद्रीय अभ्यासक्रम समीक्षा’ परिषदेमध्ये रविवारी घेण्यात आला.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) केंद्रीय विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी प्रकाशित केलेल्या सामाजिक विज्ञानाच्या पाठय़पुस्तकांच्या समीक्षा परिषदेचे आयोजन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. इयत्ता सातवी ते बारावीच्या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील महानुभाव पंथाचा उल्लेखही नाही. वारकरी संप्रदायातील संतांविषयीही पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही. पंजाबपर्यंत संतपरंपरेचा प्रसार करणाऱ्या संत नामदेव यांचाही उल्लेख नसल्याची खंत उपस्थितांनी या वेळी व्यक्त केली. या परिषदेमध्ये पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, तत्त्वज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. श्रीधर आकाशकर, कला विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव मोहिते, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. श्यामा घोणसे, संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले.
या वेळी डॉ. मोरे म्हणाले, ‘‘जी चूक महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत केंद्रीय अभ्यासमंडळाने केली, तीच चूक संत सहित्याबाबतही झाली आहे. संत नामदेवांनी राज्याच्या सीमा ओलांडून संत परंपरेचा प्रसार केला. मात्र, देशपातळीवरील संतांमध्येही त्यांचा उल्लेख नाही. या सगळ्यामुळे पुढील पिढय़ांचे नुकसान होणार आहे.’’ याबाबत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला निवेदन देण्यात येणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
डॉ. कामत म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला संताची भूमी म्हटले जाते. फक्त महाराष्ट्राच्याच जडणघडणीमध्ये नाही, तर देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्येही महाराष्ट्रातील संतांचे मोठे योगदान आहे. संतांनी दिलेले विचार आणि त्यांचे संस्कार हे चिरकालीन टिकणारे आहेत. भावी पिढीवर संस्कार होण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक जाणिवा पक्क्य़ा होण्यासाठी संतांच्या कार्याची ओळख त्यांना झाली पाहिजे.’’