प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप

पंधरा वर्षे जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरला असतानाही काहींना त्याच कालावधीसाठी पुन्हा कर भरण्याच्या कायदेशीर नोटिसा येऊ लागल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, चुकून नोटीस आली असेल. मात्र, एकदा पर्यावरण कर भरला असल्यास पुन्हा तो भरण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाच्या नियमाप्रमाणे पंधरा वर्षे वयोमान झालेल्या वाहनांना पर्यावरण कराचा भरणा करावा लागतो. वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या नोंदणी पुस्तकावरच वाहनाचे वयोमान पंधरा वर्षे कधी होणार, याची तारीख नोंदविलेली असते. या तारखेच्या आत पर्यावरण कर भरावा लागतो. त्यानंतर दोन टक्क्य़ांनुसार दंडाची आकारणी केली जाते. पर्यावरण कराचा भरणा केल्यानंतर संबंधित वाहनाची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी केली जाते. वाहन रस्त्यावर धावण्याच्या योग्य असेल, तरच वाहनाला पुढील पाच वर्षांसाठी नोंदणी करून वाहतुकीस परवानगी दिली जाते.

गेल्या काही दिवसांमध्ये शासनाच्या नियमानुसार पर्यावरण कराचा भरणा करून आणि पुढील पाच वर्षांसाठी वाहन रस्त्यावर धावण्याची परवानगी मिळाली असतानाही काहींना पुन्हा त्याच कालावधीसाठी पर्यावरण कर भरण्याच्या नोटिसा सध्या येत आहेत. संबंधित कायदेशीर नोटिसांबाबत सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी पर्यावरण कर भरूनही काहींनी पुन्हा कराचा भरणा केला आहे. त्याचप्रमाणे याबाबत सर्वसामान्यांनी आरटीओ कार्यालयात विचारणा केल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही. त्यातून नागरिकांना नाहक दंडाला सामोरे जावे लागते. पर्यावरण कर भरल्याबाबतच्या नोंदी अद्ययावत केल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे संबंधित नोंदी ऑनलाइन पद्धतीवर घेताना निष्काळजीपणा केला जात असल्यानेच नागरिकांना आर्थिक भरुदड सोसावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पर्यावरण कर भरला असेल, तर नोटिसांकडे दुर्लक्ष करा. वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या पर्यावरण कराची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. ती नोंद ऑनलाइन पद्धतीवर घेताना चूक राहू शकते. आता नव्या वाहनांची नोंद थेट ऑनलाइन पद्धतीवर होत आहे. त्यामुळे या वाहनांबाबत काही समस्या निर्माण होणार नाहीत. या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करू.

– अजित शिंदे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी