मुठा उजवा कालव्याजवळ मोहीम सुरू

पुणे :  मुठा उजवा कालवा फुटल्याची दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून कालव्यानजिक असणाऱ्या अतिक्रमणांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी कमी अतिक्रमणे आहेत, तेथे नोटिसा देण्यात येत आहेत. नोटिसा बजावल्यानंतर या अतिक्रमणांविरोधात जलसंपदा विभागाकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे.

खडकवासला धरणातून गेल्या आठवडय़ापासून रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन सुरू करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने कालव्याची दुरुस्ती केली. पाणी वहनाला अडथळा होऊ नये म्हणून यांत्रिकीकरण, मजबुतीकरण करण्यात आले आहे. या दरम्यान, कालव्यानजिकची अतिक्रमणे काढण्यात आलेली नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. कालवा फुटीची दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेकडून या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही कालव्यानजिक बांधलेले अनधिकृत रस्ते आणि बांधकामांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्वत:हून विभागाच्या जागेत असलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. खडकवासला धरणापासून मुठा उजवा कालवा इंदापूपर्यंत असून तो २०२ किलोमीटरचा आहे. त्यापैकी फुरसुंगीपर्यंतचा २८ किलोमीटपर्यंत मुठा उजवा कालवा शहरातून जातो. या कालव्याच्या जागेत अनेक अनधिकृत बांधकामे झाली असून या भागात एक लाखापेक्षा जास्त नागरीवस्ती आहे. संबंधितांकडून कालव्यात कचरा, राडारोडा टाकला जात असल्याने कालव्याच्या पाणीवहनावर त्याचा सातत्याने परिणाम होत आहे.

जलसंपदा विभागाच्या जागांवरील अतिक्रमणांचे गेल्या काही वर्षांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये पर्वती, जनता वसाहत, हडपसर औद्योगिक वसाहत, मगरपट्टा, साडेसतरा नळी या ठिकाणांवर कालव्याच्या जागेत मोठय़ा संख्येने अतिक्रमणे झाल्याचे निदर्सनास आले आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कालवा फुटीची दुर्घटना घडल्यानंतरही महापालिकेकडून अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान, खडकवासला धरणापासून नांदेड सिटी, वडगाव बुद्रुक, स्वारगेट, लष्कर, रेसकोर्सच्या बाजूने (जमिनीखालून), हडपसर (मगरपट्टा सिटीला लागून), फुरसुंगी असा २८ किलोमीटर शहरातून जाणाऱ्या कालव्याच्या पर्यायाने जलसंपदाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणांमुळे कालवा, त्याचा भराव आणि पाया यांची क्षेत्रीय तपासणी (ऑन द स्पॉट) विभागाकडून करण्यात आली आहे.

मुठा उजवा कालव्यानजिक असलेल्या अतिक्रमणांबाबत जलसंपदा विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सध्या ज्या ठिकाणी संख्येने कमी अतिक्रमणे आहेत, अशा ठिकाणच्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मोठय़ा संख्येने झालेल्या अतिक्रमणांबाबत नंतर कारवाई केली जाईल.

– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग