लाडू असो, कलाकंद किंवा बर्फी असो, आता सुटय़ा मिठाईच्या सेवनाची कालमर्यादा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’च्या या कायद्याची गुरुवारपासून (१ ऑक्टोबर) देशभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मिठाईच्या दुकानांतून सुटय़ा मिठाईची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र त्यावर मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल (बेस्ट बिफोर) हे यापूर्वी लिहिले जात नव्हते. त्यामुळे खरेदी केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो, हे ग्राहकांना समजत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे.  देशातील अनेक मिठाई दुकानांतून पॅकेजिंग न करता विक्री केली जाते. काही दुकानांमधून छोटय़ा प्लास्टिक बॉक्समधून पदार्थाची विक्री केली जाते. मात्र संबंधित पदार्थ नेमका किती दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो याचा उल्लेख अनेकदा नसतो. नव्या कायद्यानुसार उत्पादकांना अन्नपदार्थावर कालमर्यादेचा उल्लेख बंधनकारक करण्यात आला आहे.

कालमर्यादेचा उल्लेख नसलेल्या पदार्थाची मुदत संपली असे गृहीत धरून गुरुवारपासून त्याची विल्हेवाट लावली जाईल. मिठाईमध्ये असलेल्या खव्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते, ही बाब ध्यानात घेऊन या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यानुसार कालमर्यादेचा उल्लेख नसल्यास संबंधित व्यापाऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई होऊ शकते.

– सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, पुणे विभाग