News Flash

पारव्यांच्या जेवणावळींचा वाहनचालकांना उच्छाद

ऐन वाहतुकीच्या रस्त्यावर पारव्यांच्या जेवणावळी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

पारव्यांच्या जेवणावळींचा वाहनचालकांना उच्छाद

आतापर्यंत कधी वाटेत येणारे कुत्रे, काही भागांत डुक्कर हे वाहनचालकांचे शत्रू होते; मात्र आता त्यात पारव्यांचीही भर पडली आहे. ऐन वाहतुकीच्या रस्त्यावर पारव्यांच्या जेवणावळी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर पारव्यांचे थवे बसलेले दिसतात. अनेक दुकानदारांकडून अगदी भर रस्त्यांवर त्यांच्यासाठी धान्याची पोतीही ओतली जातात. शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरही पारव्यांना खाणे घातले जाते. मात्र, त्यापेक्षाही पुढे जाऊन हे थवे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. खाणे टाकलेल्या ठिकाणी वाहनचालकांच्या अंगावरून अचानक जाणाऱ्या या थव्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गाडी चालवत असताना अचानकपणे चेहऱ्यावरच येणाऱ्या थव्यामुळे दुचाकी वाहनचालक गडबडतो. शहरात कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे नगरमधील रस्ते, सातारा रस्ता अशा भर रहदारीच्या रस्तांवर पारव्यांना खाणे घातले जाते. याबाबत अमोल बापट या तरूणाने सांगितले, ‘‘सीडीएसएसच्या चौकात अगदी कंपनीच्या गेटमध्ये पारव्यांना खाणे घातले जाते. शेकडो पारव्यांचा थवा तेथे असतो. एखाद्या गाडीने हॉर्न वाजवला किंवा सिग्नल सुटला की सगळा थवा एकदम उडून वाहनचालकांच्या अंगावर येतो. गाडी चालवताना अचानकपणे असे थवे अंगावर आल्यामुळे गोधळ उडतो.’’
रस्त्यावर भरणाऱ्या पारव्यांच्या या पंगतींमुळे चालणाऱ्या नागरिकांचीही अडचण होते आहे. अनेक ठिकाणी पदपथ, तर काही ठिकाणी अगदी अर्धे रस्तेही पारव्यांनी भरून गेलेले दिसतात. रस्ताभर पसरलेले धान्य आणि ते टिपणारे पारवे यांना चुकवत रस्त्यावर चालण्याची कसरतच नागरिकांना करावी लागते. त्यातच पारव्यांच्या या थव्यांवर धावून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांचीही भर पडते. खाणे मिळत असल्यामुळे पक्षी याच भागांतील इमारतींवर राहतात. त्यामुळे ज्या ठिकाणी पारव्यांना दुकानदार खाणे घालतात त्या भागांत राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास होतो, अशी तक्रार अरविंद देशपांडे या कर्वे नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 3:20 am

Web Title: obstacle of piegons for traffic
Next Stories
1 स्वाइन फ्लू रुग्णांना अर्थसाहाय्य योजनेचा वर्षभरात केवळ १६ जणांना फायदा!
2 लघुउद्योजकांच्या समस्येसाठी लवकरच बैठक – आयुक्त
3 हसवाफसवी
Just Now!
X