एक व्यंगचित्र दहा अग्रलेखांचे काम करते, असे म्हटले जात असले, तरी वास्तविक एक छायाचित्र दहा व्यंगचित्रांचे काम करते, ही वस्तुस्थिती आहे. जिथे शब्दांना मर्यादा येते, तिथे छायाचित्र किमया घडविते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पिंपरीत केले.
पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार

प्रदर्शनातील ‘झेब्रा क्रॉसिंग’ वरून जाणारी बदके हे छायाचित्र लहान मुलांच्या आकर्षणाचा विषय ठरले.

संघाने लोखंडे कामगार भवनात आयोजित केलेल्या ‘प्रतिबिंब’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार तेंडुलकरांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेविका सीमा सावळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत जाधव आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन तीन सप्टेंबपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत विनामूल्य खुले आहे.
तेंडुलकर म्हणाले, समाजाच्या संवेदना जागवण्यासाठी वृत्तपत्र छायाचित्र हे प्रभावी व शक्तिशाली माध्यम आहे. विसरलेले व हरवलेले माणूसपण परत आणण्यासाठी वृत्तपत्र छायाचित्रांसारखे प्रभावी माध्यम नाही. या कलेच्या प्रांतात आपली स्पर्धा आपल्याशीच आहे, याची जाणीव ठेवावी. आयुक्त परदेशी म्हणाले, करुणा, प्रेम, दया, क्रोध, हिंसा अशा विविध रसांचे सौंदर्य वृत्तपत्र छायाचित्रांतून पाहायला मिळते.
प्रास्तविक जयंत जाधव यांनी केले. अश्विनी डोके यांनी सूत्रसंचालन केले. बापू ओव्हाळ यांनी आभार मानले.