कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निर्यातबंदीनंतर कांदा उत्पादक शेतकरी घाबरून मोठय़ा प्रमाणावर साठवलेला कांदा विक्रीस पाठविणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून कांद्याला चांगले दर मिळत होते. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याला ४० रुपये दर मिळत होता. निर्यातबंदीमुळे मात्र शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच देशांतर्गत बाजारपेठेतील दर कमी होतात, असा अनुभव आहे.
साठवणूक केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर विक्रीस पाठविण्यात येतो. त्यामुळे कांदा दरात घसरण होते. निर्यातबंदी जाहीर झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी लगेचच कांदा बाजारात विक्रीस पाठवितात. निर्यातबंदीचा निर्णय शेतक ऱ्यांचे नुकसान करणारा आहे, असे निरीक्षणश्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी नोंदवले.
साठवलेला कांदा विक्रीस
मार्च महिन्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. राज्यातील बाजार समित्या या काळात बंद होत्या. जुना कांदा अनेक शेतकऱ्यांनी बांधावर विकला. कांदा चाळीत साठवलेला जुना कांदा गेले पाच ते सहा महिने बाजारात विक्रीस पाठविण्यात येत होता. जुना कांदा खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याला ४० रुपये असे दर मिळाले.
नवीन कांद्याच्या रोपांचे नुकसान
महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम साधारपणे डिसेंबर, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होतो.
कांदा लागवड करणाऱ्या नाशिक, नगर तसेच पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा रोपे वाहून गेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम दीड ते दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.