पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरांत सवलत

पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) आपली निवासस्थाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील सात निवासस्थाने सुरू करण्यात आली असून दोन निवासस्थाने येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी पर्यटकांना खोल्या आरक्षित करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एमटीडीसीने करोना काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. टाळेबंदी काळातही एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांकडून  निवासस्थानांच्या खोल्या, परिसर स्वच्छ ठेवत निवासस्थानांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली आहे. पर्यटक निवासस्थानांचे र्निजतुकीकरण करण्यात आले असून उपाहारगृह आणि अनुषंगिक बाबींची स्वच्छता करण्यात आली आहे. या निवासस्थानांचे पुढील वर्षभर र्निजतुकीकरण सातत्याने करण्यात येणार आहे. यासह शरीर तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाइज करणारे स्प्रे, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण मोजणारे यंत्र अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

‘पुणे विभागातील महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात एमटीडीसीची निवासस्थाने सुरू ठेवण्यात आली आहेत. शासनाच्या आदेशानुसार ही निवासस्थाने पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली आहेत. या निवासस्थानांमधील खोल्या आरक्षित करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किल्ले सिंहगड आणि अक्कलकोट पर्यटक निवासस्थाने करोना संसर्गामुळे अद्याप बंद आहेत. सिंहगड निवासस्थान पुढील आठ, तर अक्कलकोट १५ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे’, अशी माहिती पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

निवासस्थानांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. करोनामुळे सर्व लोक घरी बंदिस्त असल्याने टाळेबंदीतून मुभा मिळाल्याने पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतील व पर्यटनाला चालना मिळेल, असेही हरणे यांनी सांगितले.

संके तस्थळाद्वारे पर्यटकांना माहिती

यापुढे महामंडळाची आणि पर्यटन स्थळांची प्रसिद्धीही देशी पर्यटकांना के ंद्रस्थानी ठेवून करावी लागणार आहे. पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थाची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती संके तस्थळ आणि वॉट्स अ‍ॅप समूहाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

पर्यटकांसाठी खास सुविधा

पर्यटकांसाठी नावीन्यपूर्ण अशा ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ या संकल्पनेंतर्गत महामंडळाच्या निवासस्थानांवर वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ आणि ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही हरणे यांनी सांगितले.