राज्य मंडळातर्फे  घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी १७ क्रमांक अर्ज भरून खासगी रीत्या प्रविष्ट होण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंडळाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना  http //form17.mh.hsc.ac.in 2020 या संकेतस्थळाद्वारे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना  http //form 17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीच्या दोन छायाप्रती आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत. त्यानंतर ४ नोव्हेंबरला संपर्क  शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी जमा केलेली कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळांकडे जमा करायची आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

करोना संसर्गामुळे बदल..

करोना संसर्गामुळे दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर करण्यात आला असल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाइन नावनोंदणीबाबत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख ३० सप्टेंबर २०२० ही ग्राह्य़ धरावी. हा बदल करोना संसर्गामुळे केवळ २०२१च्याच परीक्षेपुरता लागू असेल. तर विद्यार्थ्यांच्या वयासाठी ३० जून २०२० ही तारीख असेल, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.