24 August 2019

News Flash

विद्यार्थी लेखकांचा आतला आवाज!

प्रसारमाध्यमांमधून तरुणांसमोर येणाऱ्या अनेकविध विषयांवर ‘विद्यार्थी लेखकां’नी केलेला विचार, त्यांचा आतला आवाज ‘लोकांकिकां’च्या माध्यमातून व्यक्त झाला.

प्रसारमाध्यमांमधून तरुणांसमोर येणाऱ्या अनेकविध विषयांवर ‘विद्यार्थी 5lekhak3लेखकां’नी केलेला विचार, त्यांचा आतला आवाज ‘लोकांकिकां’च्या माध्यमातून व्यक्त झाला.
‘बीएमसीसी’च्या ‘व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन’मधून बलात्काराच्या खोटय़ा गुन्ह्य़ाचा फारसा चर्चिला न गेलेला विषय मांडला गेला. विद्यार्थी लेखक अद्वैत रहाळकर म्हणाला,‘मी या विषयाशी संबंधित एक कथा वाचली होती, त्यानंतर इंटरनेटवरही दिल्ली, मुंबईत नोंदवल्या गेलेल्या अशा गुन्ह्य़ांबद्दल वाचायला मिळाले. स्त्री-पुरूषांमध्ये तयार होणाऱ्या अशा प्रकारच्या मानसिकतेबद्दल आणि गुन्हा नोंदवला जाताना खरेपणाचे काय, याबाबत विचार सुरू झाला. स्वत:च्या हक्कांची जाणीव होणे उत्तमच, पण त्याचा गैरवापर केला जाऊ नये. माझ्या वयोगटाशी हा विषय जवळचा वाटला आणि मुलगा म्हणून त्यावर बोलावेसे वाटले.’
‘आयआयआयटी’च्या ‘आंधळे चष्मे’मध्ये मार्क्स आणि फ्रॉईड असे दोन टोकांचे विचारप्रवाह एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थी लेखिका शामली करंजकर म्हणाली,‘मार्क्सवादाविषयी मी आधीही वाचले होते, पण अच्युत गोडबोले यांच्या ‘मनात’ या पुस्तकात त्याविषयी आणखी वाचायला मिळाले. मार्क्सने मांडलेली गरीब- श्रीमंत ही दरी आणि फ्रॉईडने मांडलेला ‘जग किती सुंदर आहे,’ हे विचार एकमेकांपेक्षा पूर्णत: वेगळे आहेत. म्हणूनच ते या दोन व्यक्तींच्या संवादातून एकत्र आणले.’
वडील आणि मुलीच्या नात्याचा एक वेगळा पैलू ‘एमआयटी’च्या ‘कश्ती’ या एकांकिकेमधून दिसला. विद्यार्थी लेखक आदेश ताजणे म्हणाला,‘मुलींना पाळी येणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट असूनही त्याचा आपल्याकडे फार बाऊ केला जातो. पण वडील आणि मुलीच्या नात्यात देखील या विषयावर मोकळी चर्चा होऊ शकते हे एकांकिकेतून मांडले.’
‘सिंहगड’च्या (वडगाव) ‘रोहिणी’ या एकांकिकेचा विद्यार्थी लेखक हितेश पोरजे म्हणाला,‘अगदी साध्या विषयातूनही नाटय़निर्मिती होऊ शकते हे मला मांडावेसे वाटले.  बायकोच्या आठवणीत जगणारा, स्वत:च्या अट्टाहासामुळे एकटा पडलेला एक माणूस त्याच्या घरी काम करणाऱ्या एका मुलाच्या बहिणीमुळे कसा बदलतो, निरागस रोहिणी त्याला सकारात्मक दृष्टिकोन कशी देते याची गोष्ट आम्ही सादर केली.’
द. मा. मिरासदार यांची ‘भुताची गोष्ट’ ही लोकप्रिय कथा ‘फग्र्युसन’ने ‘पिंपरान’मधून समोर आणली. कथेचे नाटय़रुपांतर करणारा विद्यार्थी किशोर गरड म्हणाला,‘प्रत्येक गावात भुताच्या जन्माचे असे किस्से सांगितले जातात. गैरसमजुतींमधून हे किस्से कसे जन्मतात यातली गंमत मला मांडावीशी वाटली.’

जुना काळ उलगडला!

केवळ रोजच्या जगण्यातले विषयच नव्हे, तर प्राचीन काळाचे आणि इतिहासाचे संदर्भ घेऊन, त्याचा अभ्यास करुन आपली कथा आजच्या संदर्भाने मांडण्याचाही प्रयत्न विद्यार्थी लेखकांकडून दिसून आला.
‘गरवारे’च्या ‘जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेने ग्रीक पुराणांमध्ये आलेला ‘पँडोराज बॉक्स’ हा संदर्भ फुलवला. विद्यार्थी लेखक आदित्य भगत म्हणाला,‘गावोगावी फिरुन गोष्टी सांगण्याची- म्हणजे ‘स्टोरीटेलिंग’ची संकल्पना आमच्या डोक्यात होती. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रीक पुराणांमधल्या ‘पँडोराज बॉक्स’वरुन आम्ही ‘आशा’ ही प्राथमिक कल्पना घेतली आणि तो विषय आजच्या संदर्भाची जोड देऊन मांडला.’
‘इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स’ची विद्यार्थिनी लेखिका अमृता ओंबळे हिने लिहिलेल्या ‘ईश्वरसाक्ष’ या एकांकिकेतून प्राचीन काळातली वसुंधरा आणि रघुवीरा यांची कथा समोर आली. ‘देवत्वाचा शोध’ या संकल्पनेभोवती फिरणारी ही एकांकिका होती. श्रेयस सिकची या विद्यार्थी लेखकाची ‘काफिर’ ही एकांकिका ‘पीव्हीजी’ने सादर केली. शिवाजी महाराजांबरोबर मावळा म्हणून काम करण्याची अतीव इच्छा असणाऱ्या, पण आपल्या वडिलांनीच महाराजांशी गद्दारी केल्यामुळे पदोपदी झिडकारल्या गेलेल्या तरुणाची गोष्ट या कथेतून समोर आली.
—–

सध्याच्या समाजजीवनावर तरुणांचे भाष्य!

विद्यार्थी लेखक अभिप्राय कामठे याने लिहिलेल्या ‘एमएमसीसी वाणिज्य महाविद्यालया’च्या ‘गाव चोरांचं’ या एकांकिकेतून ‘व्यवस्था’ या विषयावर वेगळ्या पद्धतीने विचार मांडले गेले. चोरांच्या गावात चोरी न करणारा अनोळखी माणूस आल्यावर गावातील चोऱ्यांचा बिघडलेला तोल, त्यातून पुढे चोरांमध्ये निर्माण झालेले गरीब- श्रीमंत हे वर्ग अशी काहीशी वेगळी कथा या एकांकिकेतून पुढे आली. दुष्काळी परिस्थिती, तरुणांमधील ‘लिव्ह इन’ नातेसंबंध, ‘नो फीलिंग्ज-नो अटॅचमेंट’ची मानसिकता असे विविध विषयही एकांकिकांमधून तरुणांनी मांडले.

  ‘लोकांकिकां’च्या पुण्यातील प्राथमिक फेरीचे ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
‘ ‘लोकांकिकां’चा उपक्रम उत्तम आहे. वृत्तपत्र ही चीज अशी आहे, की ती सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांना स्पर्श करते. त्यामुळे वृत्तपत्र जे-जे ‘कव्हर’ करते त्याचे दृश्य स्वरूप एकांकिकांमधून दिसावे असे वाटते. तरुण मुलांचे प्रश्न, त्यांचे नातेसंबंध, शिक्षणापासून नोकऱ्यांपर्यंतच्या त्यांच्या समस्या हे संदर्भ एकांकिकांमध्ये यावेत.’
चंद्रकांत काळे, ज्येष्ठ रंगकर्मी

First Published on October 6, 2015 3:30 am

Web Title: opening of primary round of loksatta lokankika by chandraknt kale