गुटखा बंदीच्या नियमांची सर्वत्र पायमल्ली
महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला तरी मावळ तालुक्यात सर्वत्र खुलेपणाने गुटखा विक्री सुरू आहे. ठराविक लोकांना हप्ते द्या आणि दुकाने, पानाच्या टपऱ्या वा अन्य कोठेही बिनधास्तपणे गुटखा विक्री करा, असा अलिखित फतवाच हप्तेखोरांनी काढला असल्याची परिस्थिती आहे.
कर्करोगासारख्या घातक रोगांचे मूळ असलेली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही मावळात सर्वत्र खुलेआम चढय़ा भावाने गुटखा विक्री सुरू आहे. कामशेत शहरात तर गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे. लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगर परिसरात किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे.
विविध पोलीस ठाण्यांचे कलेक्टर समजले जाणारे काही पोलीस कर्मचारी या दुकानदारांना धमकावत त्यांच्याकडून मासिक हप्ते घेत खुलेआम गुटखा विक्रीसाठी अलिखित परवानगी देत असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले. टोलनाके व राष्ट्रीय महामार्गालगतच्या चहाच्या टपऱ्यांकडून जादा रक्कम आकारली जात आहे. एकुणातच मावळात सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही गुटखा विक्रीवर कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. या भागात विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती दिसत आहे.
सहा महिन्यांपूर्वी लोणावळ्याजवळील भरवनाथनगर येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा साठा व दोन गाडय़ा ताब्यात घेतल्या होत्या. मुंबई भागातून हा गुटखा मावळात आणला जातो असे त्या वेळी सांगण्यात आले होते. या गुटखा विक्रीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. मात्र जेथे कुंपणच शेत खात आहे, तेथे कारवाई करायची
कोणावर व करणार कोण हे प्रश्न उपस्थित होत असून कारवाई करणाऱ्यांच्या खिशातच गुटख्याच्या पुडय़ा असल्याची परिस्थिती आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखा विक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत असून पशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलत हप्तेखोरांवर तसेच सर्रासपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मावळवासीयांकडून होत आहे.

amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी
E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती