थकीत दंड न भरणाऱ्यांकडून वाहतूक पोलिसाकडून दंड वसुली

पुणे : शहरात वाहतूकबंदी तसेच संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर वाहतूक नियमभंगाचे प्रमाण कमी झाले आहे. नियमभंग करणाऱ्या अनेक वाहनचालकांनी अद्याप थकीत दंड भरला नसून वाहतूकबंदीचे आदेश मोडून बाहेर पडणारे वाहनचालक अलगदपणे वाहतूक पोलिसांच्या सापळ्यात सापडत आहेत. ज्यांनी अद्याप दंड  भरला नाही, अशांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी १३ हजार ३४९ वाहनचालकांकडून थकीत दंडापोटी ६० लाख ४० हजार ९३६ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतूकबंदीचे आदेश मोडून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांकडून थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकात नाकाबंदी केली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना अडवण्यात येत असून ज्यांनी दंड भरला नाही अशांकडून थकीत दंडाची रक्कम वसूल केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात वाहनचालकांडून केल्या जाणाऱ्या नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल मोडणे, पादचारी मार्गावर वाहन थांबविणे, आसन पट्टा न लावणे, मोबाइलवरील संभाषण अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. चौकाचौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते.

नियमभंग केल्यास वाहनचालकांना संदेश पाठविण्यात येतो. नियमभंगाचा प्रकार, दंडाच्या रकमेबाबतची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. ऑनलाइन पद्धतीने दंड  भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमभंग करणारा वाहनचालक सापडल्यास त्याच्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाकडून ई-चलन यंत्राद्वारे दंड वसूल केला जातो.

वाहतूक पोलिसांनी दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना दंड भरण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, अनेकांनी दंड भरण्यास टाळाटाळ केली होती. टाळेबंदीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी कारवाईत ३६ हजार ९२६ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी १३ हजार ३४९ वाहनचालकांनी दंड न भरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत ६० लाख ४० हजार ९३६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दंडवसुली करताना पोलिसांकडून खबरदारी

थकीत दंडवसुलीसाठी पोलिसांनी चौकाचौकात सापळे लावले असून एखादा वाहनचालक या कारवाईत सापडल्यानंतर त्याच्याकडून डेबिट कार्डची विचारणा केली जाते. डेबिट कार्ड घेतल्यानंतर त्याच्यावर जंतुनाशकाची फवारणी केली जाते. त्यानंतर वाहतूक पोलीस ई-चलन यंत्राद्वारे दंड वसूल करतात. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी वाहतूक पोलीस हातमोजे, मुखपट्टी, जंतुनाशकाचा वापर करत आहेत. वाहतूक शाखेतील एक कर्मचारी करोनाबाधित असल्याचे नुकतेच उघडकीस आले.

शहरात वाहतूकबंदीचे आदेश आहेत. आदेश मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. काही जणांकडे पोलिसांचा परवाना देखील नाही. विनाकारण काही जण बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यांनी थकीत दंड भरला नाही,अशांकडून सध्या दंड वसूल करण्यात येत आहे.

– अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नियोजन), वाहतूक पोलीस शाखा