राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असं देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं होतं, असा आरोप सिंग यांनी केला आहे. सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यातील अलका चौकात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख वादात सापडले आहेत. देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाकडून राज्यातील विविध शहरांत आंदोलन करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, “गृहमंत्री अनिल देशमुख हे जर राजीनामा देत नसतील तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले पाहिजे. हा विषय देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केल्यावर विधानसभा अनेक वेळा तहकूब झाली. यामुळे परमबीर सिंग यांच्या कालच्या पत्रामुळे वर्षभर असाच तमाशा चालू होता हे स्पष्ट झाले आहे. तसेच सभागृहात देखील सचिन वाझेला वाचविण्याचे काम अनिल देशमुख यांनी केले असून, या संपूर्ण प्रकरणी देशमुख हे देखील दोषीच आहेत. त्यामुळे त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी पाटील यांनी केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले,”परमबीर सिंग म्हणतात की, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार यांना जाणीव करुन दिली होती. हे सर्व असेल तर ठाकरे सरकार अशा गोष्टींना सरंक्षण देण्याचं काम करीत आहे. ही निषेधार्थ बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. तसे न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा द्यावा,” अशी मागणी पाटील यांनी केली.