पुणे-सातारा रस्त्यावर रिलायन्सची ‘योजना’; खड्डय़ांमुळे चाळण; टोलवसुली मात्र जोमात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामार्गाच्या पुणे ते सातारा दरम्यानच्या भागाची दशा एखाद्या गल्लीतील दुर्लक्षित रस्त्यासारखी झाली आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय महामार्ग नव्हे, तर राष्ट्रीय खड्डेमार्ग म्हणण्याची वेळ आली आहे. सहापदरीकरण केलेल्या रस्त्यावरही खड्डे असून, कासवगतीने सुरू असलेल्या उड्डाण पुलांच्या ठिकाणी सेवा रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याकडे ढुंकूनही न पाहता टोलवसुली मात्र जोमात सुरू असल्याने ‘टोल भरा आणि खड्डय़ात जा’, अशीच ‘योजना’ वाहन चालकांसाठी ‘रिलायन्स’कडून अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे.

रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० मध्ये राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीला देण्यात आले. अडीच वर्षांच्या मुदतीचे हे काम नऊ वर्षांनंतरही सुरूच आहे. खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी, अपघात, इंधन आणि वेळेचा अपव्यय होत आहे. असे  असतानाही ठेकेदार वा महामंडळाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

खेड-शिवापूर चौकात अनेक दिवसांपासून खड्डे पडलेले आहेत. अगदी टोल नाक्याजवळही खड्डे दिसून येतात. वरवे गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर एका उड्डाणपुलाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडले आहे. या भागात रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. काही भागात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यापुढे चेलाडी फाटा येथेही उड्डाणपुलाचे काम कासवगतीनेच सुरू असून, या भागात रस्त्यावर डांबरही शिल्लक राहिलेले नाही.

किकवी गावच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचीही दैना अशीच आहे. या भागात संध्याकाळी सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. प्रतितास १० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहने पुढे जाऊ शकत नाहीत. रखडलेल्या उड्डाणपुलाच्या आवारात सर्वच ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत. टोल भरूनही खड्डय़ातून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालक, प्रवासी हैराण झाले आहेत.

अचानक दिसणारे खड्डे आणि अपघात

किकवी गावाजवळ रखडलेल्या उड्डाण पुलाजवळून सेवा रस्त्यावर वाहतूक वळविण्यात आल्यानंतर काही वेळातच अंदाजे फुटभर खोलीचा खड्डा आडवा येतो. अगदी जवळ आल्यानंतरच वाहन चालकांचा हा खड्डा दिसतो. त्यामुळे वाहने त्यात आदळतात. त्यातून अपघातही होतात. त्याचप्रमाणे सहापदरीकरण झालेल्या रस्त्यावरही मध्येच खड्डे दिसून येतात. अचानक समोर आलेले हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नातही अपघात होत असल्याची सद्य:स्थिती आहे.

रस्ता आणि उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. तात्पुर्ती डागडुजी अत्यंत निकृष्ट केली जाते. त्यामुळे रस्त्यात मोठे खड्डे पडले आहे. वाहनांना मातीतूनच जावे लागत असल्याने उडणाऱ्या धुळीचा त्रास ग्रामस्थांना सर्वाधिक होतो आहे. – आकाश भोरडे, वरवे ग्रामस्थ